कर आकारणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळणार
By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:46:09+5:302014-08-26T23:55:33+5:30
कुरुंदवाड पालिका सभा : आठ विषयांना मंजुरी

कर आकारणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळणार
कुरूंदवाड : शहरातील मिळकतधारकांना कर आकारणी एसएमएस सुविधेद्वारे कळविण्यासाठी सॉफ्टवेअर खरेदी करणे, अल्पसंख्याक योजनेअंतर्गत मुस्लिम समाजाकरिता बालवाडी इमारत बांधकामाच्या निविदांना पालिका सभेत मंजुरी देण्यात आली. विषयपत्रिकेवरील विविध आठ विषयांवर चर्चा करून मंजुरी घेण्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय खोत होते.कुरुंदवाड, धरणगुत्ती ते जयसिंगपूर मार्गावर पंचगंगा नदीवर पूल बांधण्यासाठी धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार शिफारस देण्याचा ठराव करण्यात आला. पालिका हद्दीतील घनकचरा साईटवर पोहोच करण्यासाठी सेवापूर्तीवर आलेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेविका रजियाबेगम पठाण यांनी घंटागाड्यांना घंटाच नसल्याची तसेच शौचालयाची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाल्याची तक्रार केली. यावेळी अध्यक्ष खोत यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन घंटागाड्यांबाबतच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.चर्चेत उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, गणपतराव पोमाजे, माधुरी सावगावे, विलास उगळे, आदींनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी धोंडूबाई बागवान, विमल जोंग, कृष्णाबाई मधाळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)