तारेवाडी पुलास ‘नाबार्ड’चा हिरवा कंदील
By Admin | Updated: December 12, 2014 00:06 IST2014-12-12T00:02:59+5:302014-12-12T00:06:43+5:30
नेसरी-कोवाड मार्ग : ३ कोटी ७७ लाखांचा प्रस्ताव; प्रकल्पाची केली छाननी

तारेवाडी पुलास ‘नाबार्ड’चा हिरवा कंदील
गडहिंग्लज : नेसरी-कोवाड मार्गावरील घटप्रभा नदीवरील तारेवाडी बंधाऱ्यानजीक प्रस्तावित पुलाच्या कामास नाबार्डकडून हिरवा कंदील मिळाला. पुण्यात आज, गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची छाननी झाली. त्यात अंदाजित तीन कोटी ७७ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव मंजूर झाला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एस. बी. उत्तुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
उत्तुरे म्हणाले, नाबार्ड-२० मध्ये समाविष्ट पायाभूत सुविधा अंतर्गत मंजूर कामांच्या यादीत या पुलाचा समावेश आहे. प्राथमिक पाहणी व स्थळ पाहणीअंती सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. संकल्पचित्र मंडळाची मंजुरी मिळालेल्या या पुलाचा प्रस्ताव खात्याने नाबार्डकडे आज दाखल केला. त्यास हिरवा कंदील मिळाला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता आणि ‘नाबार्ड’चे तांत्रिक सल्लागार नागदेवते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकल्प छाननी समितीच्या बैठकीत नियोजित तारेवाडी पूल प्रकल्पाची छाननी झाली. यावेळी कोल्हापूर दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता जी. टी. पोवार, गडहिंग्लज उपविभागाचे शाखा अभियंता राजकुमार भुतेकर उपस्थित होते.
‘लोकमत’च्या वृत्त मालिकेची चर्चा
‘लोकमत’च्या ९ व १० डिसेंबरच्या अंकात किणे-नेसरी-कोवाड या प्रमुख जिल्हा मार्गावरील तारेवाडी-हडलगे दरम्यानच्या घटप्रभा नदीवर ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा वापर वाहतुकीसाठीदेखील केला जातो. मात्र, धोकादायक वळणावर असणाऱ्या या बंधाऱ्यामुळे झालेले अपघात व पर्यायी पुलाची गरज आणि प्रस्तावित पुलाच्या तपशीलासह सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. तद्ववतच, पुणे येथील बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यात चर्चा झालेल्या ‘लोकमत’च्या या वृत्तमालिकेची पुण्याच्या बैठकीतही चर्चा झाली.