‘ताराराणी’ला ‘मटका’ चिन्हच योग्य : गोऱ्हे

By Admin | Updated: October 19, 2015 00:45 IST2015-10-19T00:45:09+5:302015-10-19T00:45:22+5:30

जोरदार टीकास्त्र : असत्याच्या समर्थनासाठी श्रीकृष्णाचे उदाहरण अयोग्य

'Tarat' to mark 'Matka' is right: the bull | ‘ताराराणी’ला ‘मटका’ चिन्हच योग्य : गोऱ्हे

‘ताराराणी’ला ‘मटका’ चिन्हच योग्य : गोऱ्हे

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी ताराराणी आघाडीला काही ठिकाणी ‘कपबशी’ चिन्ह मिळाले आहे. या आघाडीच्या उमेदवारांची आणि नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना ‘कपबशी’ चिन्हाऐवजी ‘मटका’ चिन्ह मिळाले असते तर बरे झाले असते. कारण त्यांचा कारभार जगजाहीर आहे, असा उपरोधिक टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी लगावला. श्रीकृष्णाचे उदाहरण देऊन असत्य गोष्टींचे समर्थन करायचे, हे योग्य नाही, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव न घेता रविवारी पत्रकार परिषदेत केली. आमदार गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेमुळेच सरकार बहुमतात व स्थिर असल्याने कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी आमचाही हातभार राहणार आहे. महापालिका निवडणुकीत टोल लादणारे सत्ताधारी हेच आमचे प्रथम क्रमांकाचे शत्रू आहेत. आम्ही निवडणुकीपुरता नाही, तर वचनपूर्तीप्रमाणे ‘टोल बंद’ करणारच आहोत. ते आमचे कर्तव्य आहे. सांडपाणी, शहराची स्वच्छता, शौचालये, आदी मूलभूत प्रश्नांची अवस्था दयनीय आहे. यासाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षच जबाबदार आहेत. त्याचबरोबर सांडपाणी, पंचगंगा प्रदूषण, अस्वच्छता अशा समस्यांची सोडवणूक होण्याआधी ‘स्मार्ट सिटी’ची चर्चा चुकीची आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने पक्ष वाढविण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्हीही भाजपला याबाबत विचारणार नाही. त्यामुळे त्यांनीही आमच्याकडे स्पष्टीकरण मागू नये. शिवसेना-भाजपमध्ये कुरबुरीमुळे अस्वस्थता असल्याची चर्चा आहे; परंतु आमच्यातील अस्वस्थतेचा गैरफायदा कुणा दुसऱ्याला होईल, एवढे भोळसट आम्ही निश्चित नाही. त्याबाबत शिवसेना एकदम सावध आहे.
त्या पुढे म्हणाल्या, कोल्हापूर हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे या शहराची जुनी ओळख ठेवूनच हे शहर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुुरू आहे. शिवसेनेचे धोरण स्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली म्हणजे त्याचा दुसरा अर्थ घेणे चुकीचे आहे. शिवसेना-भाजपच्या सरकारबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. ते पाच वर्षे टिकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नी योग्य धोरण सरकारने आखले असते तर आता आंदोलनाची वेळ आली नसती.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘ताराराणी’च्या नगरसेवकांचा व्यवहार जगजाहीर
ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा यापूर्वीचा कारभार हा जगजाहीरच आहे; त्यामुळे त्यांच्याकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार? असा टोला आमदार गोऱ्हे यांनी लगावला. यावेळी त्यांनी ताराराणी आघाडीच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

Web Title: 'Tarat' to mark 'Matka' is right: the bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.