पुन्हा सत्तेत येण्यासाठी ताराराणी आघाडीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:21+5:302020-12-05T04:52:21+5:30
कोल्हापूर : सन १९९० ते २००७ पर्यंत सलग सतरा वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती ताराराणी आघाडीने ...

पुन्हा सत्तेत येण्यासाठी ताराराणी आघाडीची धडपड
कोल्हापूर : सन १९९० ते २००७ पर्यंत सलग सतरा वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती ताराराणी आघाडीने महानगरपालिकेवर निर्विवाद सत्ता गाजविली. पण, २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून ताराराणी आघाडी महापालिकेतील सत्तेसाठी झगडत आहे. गतवेळची निवडणूक थोडक्यात हरल्यामुळे यावेळी मात्र थोड्या अधिक ताकदीने काँग्रेस -राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे.
महापालिकेच्या राजकारणात महादेवराव महाडिक यांचे नाव अग्रभागी राहिले आहे. १९९० च्या सार्वत्रिक निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या बॅनरखाली महाडिक राजकारणात उतरले. त्यांच्या पाठीशी तेव्हा आमदार पी. एन. पाटील व अरुण नरके होते. त्या तिघांना ‘मनपा’ (महाडिक-नरके-पाटील) असे संबोधले जात होते. या मनपाला पडद्यामागे राहून राजकीय सल्ले देण्याची महत्त्वाची भूमिका नगरसेवक राहिलेले आर्किटेक्ट शरद सामंत करीत होते. महाडिक शौक म्हणून राजकारण करीत राहिले, तर पी. एन. पाटील पक्षनिष्ठेला बांधील राहून त्यांना मदत करीत राहिले. परंतु, पुढे काही काळाने पी. एन. महापालिकेच्या सक्रिय राजकारणातून बाजूला गेले.
त्यामुळे महाडिक नाव सांगतील तेच महापौर होऊ लागले. अन्य सर्व पदे सुद्धा तेच वाटत होते. प्रत्येक निवडणुकीत जिंकण्याच्या शर्यतीत पुढे असलेल्या तीन उमेदवारांना महाडिक मदत करायचे. त्यामुळे ‘जो जिंकेल तो आपला’ अशी त्यांच्या राजकारणाची दिशा राहिली. त्यामुळे दहा वर्षांतच त्यांच्याविषयी पक्षीय नेत्यांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली. पैशाच्या जोरावर राजकारण करीत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी करून महाडिक शक्तीला पराभूत करण्याचा विडा उचलला. २००० च्या निवडणुकीत महाडिकांची ताराराणी आघाडी एकीकडे असताना त्यांच्या विरोधात आठ दहा राजकीय पक्षांची महाआघाडी तयार झाली. परंतु, केवळ दोन जागा वगळता महाडिकांनी सर्व जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांचा राजकारणातील करिष्मा भलताच वधारला.
२००५ मधील निवडणुकीतही ताराराणी आघाडी पूर्ण बहुमतात गेली. त्यावेळी जनसुराज्य शक्ती व राष्ट्रवादीने प्रयत्न केला; परंतु मर्यादित यश मिळाले. विरोधी पक्ष म्हणूनच सभागृहात बसावे लागले. पण, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी २००७ मध्ये तत्कालीन महापौर सई खराडे यांच्यासह काही नगरसेवकांना फोडून सत्ता आपल्याकडे खेचून घेतली. त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नसल्याने ते शक्य झाले. तेव्हापासून ताराराणी आघाडी सत्तेत पुन्हा येण्याचा प्रयत्न करीत आहे; पण आजपर्यंत ते शक्य झालेले नाही.
२०१५ मधील निवडणूक ताराराणी आघाडीने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी करून लढविली. जोरदार हवा तयार करण्यात भाजप-ताराराणीचे नेते यशस्वी झाले. परंतु, महाडिक यांचेच निवडणूक तंत्र घेऊन उतरलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोराची टक्कर देत काठावर का असेना बहुमत हाशिल केले. ताराराणी आघाडीची पुन्हा उपेक्षा झाली. आता मात्र २०२१ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘ताराराणी’ने मागच्या तेरा वर्षांतील हिशेब चुकता करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. काहीही करून सत्ता मिळवायचीच असा त्यांचा आग्रह आहे.
- गत निवडणुकीतील पक्षाचे कामगिरी -
- ताराराणी आघाडीने लढविलेल्या जागा - ४४
- जिंकलेल्या जागा - १९
- महापालिकेत संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे
- निवडणुकीत मिळालेली मते - ५० हजार ०१३
- मतांची टक्केवारी - १७. ५१
- महाडिकच नेतृत्व करणार -
ताराराणी आघाडी पक्षाचे अध्यक्ष जरी स्वरूप महाडिक असले तरी नेतृत्व महादेवराव महाडिक हेच करतील. त्यांच्याबरोबर अमल महाडिक, गटनेते सत्यजित कदम, सुनील कदम, सुहास लटोरे असे बिनीचे शिलेदार सर्व राजकीय धुरा सांभाळणार आहेत. शहरातील राजकारणाचा अभ्यास या सर्वांनाच असल्यामुळे कोणाची ताकद किती आहे, याची माहिती त्यांनी घेतली आहे. जिंकणाऱ्या उमेदवारांनाच पक्षाचे तिकीट द्यायचे आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे ठरले आहे.
दादांनी ऐकले नाही म्हणून ...
मागच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात आठ ते दहा जागांबाबत अखेरपर्यंत एकमत झाले नाही. महाडिकांनी या जागा आपणास सोडाव्यात असा आग्रह धरला, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मी बळी देऊ शकत नाही म्हणत पाटील यांनी त्या देण्यास नकार दिला. त्यामुळे ऐनवेळी महाडिक यांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत गेले आणि निवडून आले.