दिसलेपणाऐवजी असलेपणातून सिद्ध व्हावे : तारा भवाळकर- इचलकरंजीत ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:05 IST2017-12-13T23:04:04+5:302017-12-13T23:05:29+5:30
इचलकरंजी : महिलांनी आपल्या दिसलेपणातून नव्हे, तर असलेपणातून सिद्ध व्हावे. कशाचा अभिमान बाळगायचा आणि कशाचा न्यूनगंड बाळगायचा, हे आपण ठरविल्याशिवाय

दिसलेपणाऐवजी असलेपणातून सिद्ध व्हावे : तारा भवाळकर- इचलकरंजीत ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर परिसंवाद
इचलकरंजी : महिलांनी आपल्या दिसलेपणातून नव्हे, तर असलेपणातून सिद्ध व्हावे. कशाचा अभिमान बाळगायचा आणि कशाचा न्यूनगंड बाळगायचा, हे आपण ठरविल्याशिवाय माध्यमातून केले जाणारे महिलांचे वस्तूकरण थांबणार नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनी आणि श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. यावेळी शशांक बावचकर, सौदामिनी कुलकर्णी, सौरभ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उषाताई पत्की यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या परिसंवादात प्रा. डॉ. त्रिशला कदम यांनी जाहिरात व चित्रपटातील स्त्रिया, ज्येष्ठ लेखिका निलम माणगावे यांनी मालिकेतील स्त्रिया या विषयावर मांडणी केली. मानवी जीवनासाठी मनाचा नितळपणा व भूमिकेचा स्वच्छपणा आवश्यक असतो. कुटुंब व्यवस्थेत मित्रत्वाचे नाते महत्त्वाचे असते. मात्र, माध्यमांनी मनोरंजन व घडीभराची करमणूक या नावाखाली यामध्ये फार उथळपणा आणला आहे. तरुणींनी या माध्यमांचा गुलाम अथवा व्यसनी बनू नये, असा आशय वक्त्यांनी सविस्तर मांडला. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संगीता पाटील यांनी आभार मानले.
इचलकरंजीत आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, उषाताई पत्की, निलम माणगावे, प्राचार्य अनिल पाटील, प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, आदी उपस्थित होते.