तंटामुक्ती ही अभिमानास्पद बाब
By Admin | Updated: July 4, 2015 00:48 IST2015-07-04T00:48:51+5:302015-07-04T00:48:51+5:30
चंद्रकांतदादा पाटील : शिरोळला तंटामुक्त विशेष शांतता पुरस्कार

तंटामुक्ती ही अभिमानास्पद बाब
शिरोळ : शिरोळ गावाला महात्मा गांधी तंटामुक्ती विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला असून, शिरोळ गावासाठी ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. गावातील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून समावेश करून तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष निधी देऊन गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
शिरोळ येथील शिवाजी चौकात महात्मा गांधी तंटामुक्त व विशेष शांतता पुरस्कार वितरण कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उल्हास पाटील उपस्थित होते.
शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असून, या गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. तसेच तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवू, असेही पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात बोलताना उपसरपंच पृथ्वीराज यादव म्हणाले, ग्रामस्थांच्या एकीमुळे आणि पोलीस ठाण्याच्या सहकार्यामुळे तंटामुक्तीचा अभियान आम्ही पूर्ण करू शकलो. गेल्या दोन वर्षांत नऊ कोटींची विकासकामे आम्ही करू शकलो.
यावेळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी तंटामुक्त व विशेष शांतता पुरस्काराचा साडेबारा लाख रुपयांचा धनादेश तंटामुक्त समितीला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणपतराव गावडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीसाठी शासनाकडून लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाळ हा मोठा धार्मिक सोहळा होणार असून, शासनाने विकासाचा आराखडा तयार करून भरघोस निधी प्राप्त करून द्यावा. शिरोळ गाव तंटामुक्तीकडून शांततेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे गावच्या विकासात आता भर पडणार आहे.
यावेळी सरपंच सुवर्णा कोळी, ‘दत्त’चे संचालक अनिल यादव, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, युसूफ मेस्त्री, दलितमित्र अशोकराव माने, दरगू गावडे, पंचायत समिती सदस्या अनिता माने, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक वसंत बागल, माजी पोलीस निरीक्षक रवींद्र पोवार, धनपाल खोत, मधुकर पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष वैभव उगळे, सहायक निबंधक सचिन धायगुडे यांच्यासह तंटामुक्तीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाजीराव माने-देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)