‘पुणेरी पलटण’ संघाचे शिरोलीत ‘टॅलेंट हंट’
By Admin | Updated: November 28, 2014 00:32 IST2014-11-28T00:26:23+5:302014-11-28T00:32:54+5:30
कबड्डी : ४ डिसेंबरला स्पर्धेचे आयोजन

‘पुणेरी पलटण’ संघाचे शिरोलीत ‘टॅलेंट हंट’
सतीश पाटील - शिरोली -प्रो-कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघाने चांगले खेळाडू शोधण्यासाठी शिरोली (पुलाची) येथील नवभारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर ४ डिसेंबरला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांतील एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत.
आयपीएलच्या धर्तीवर सन २०१४ पासून प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले. पहिल्या हंगामात आठ संघांचा समावेश होता. पहिल्या हंगामात पुणेरी पलटणला समाधानकारक यश मिळाले नाही. प्रो-कबड्डीचा दुसरा हंगाम फेब्रुवारी २०१५ मध्ये लगेचच सुरू होणार आहे. या हंगामात पूर्ण ताकदीने उतरण्याचे पुणेरी पलटनने ठरविले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागवार त्यांनी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून त्यातून त्यांनी चांगले खेळाडू निवडण्याचे ठरविले आहे.
कबड्डीत महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीच्या खेळाडंूचे मोठे वर्चस्व आहे. पहिल्या हंगामात सांगलीचे काशिनाथ आडके व नितीन मदने, तर कोल्हापूरचा सागर खटाळे हे तीन खेळाडू खेळले. त्यांनी हा हंगाम चांगलाच गाजविला. आता या निमित्ताने आणखी काही खेळाडूंना नवीन व्यासपीठ मिळणार आहे.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या प्रो-कबड्डीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना व मुलांना कबड्डीमुळे चांगले दिवस आले आहेत. अनेक खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. शिरोली येथील नवभारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर ४ डिसेंबरला दिवस-रात्र सत्रात ही स्पर्धा मॅटवर होणार आहे. या स्पर्धेतून खेळाडू निवडण्यासाठी पुणेरी पलटणचे संघ व्यवस्थापक, अधिकारी तसेच कबड्डीतील अर्जुन पुरस्कार प्राप्त पंकज शिरसाट, शांताराम जाधव, आदी उपस्थित राहणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत १४ संघ यात सहभागी होणार असल्याने शिरोली व जिल्ह्याला खूप दिवसांनंतर चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळणार आहे. नवभारत मंडळानेही या स्पर्धा मॅटवर घेतल्या असून, त्याचे नेटके नियोजन लावले आहे.