‘टेकवाडी’चा हट्ट नडतोय

By Admin | Updated: August 1, 2014 00:36 IST2014-08-01T00:01:46+5:302014-08-01T00:36:03+5:30

पुनर्वसनाला प्रतिसादच नाही : पुरामुळे जमीन खचण्याची शक्यता

'Takwadi' is not an issue | ‘टेकवाडी’चा हट्ट नडतोय

‘टेकवाडी’चा हट्ट नडतोय

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील अख्खं माळीण गाव डोंगर कोसळल्यानंतर गाडलं गेल्याची घटना घडली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गाव चर्चेत आलंय. तुफान पाऊस, कुंभी व धामणी नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा वेढा आणि डोंगरावर असलेलं गाव खचण्याची शक्यता अशी संकटे असतानाही गावातच राहण्याचा हट्ट टेकवाडीतील ६७ कुटुंबांना नडतोय. वेळ, काळ आणि कोणतंही संकट सांगून येत नाही, तरीही गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना दाद न देता तेथेच राहण्याचा हट्ट सोडलेला नाही.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर तिसंगीपैकी टेकवाडी या गावात ६७ कुटुंबे राहतात. या गावात १५० हून अधिक जनावरेही आहेत. प्रत्येक पावसाळ्यात कुंभी आणि धामणी नदीला पूर आला की, गाव पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले जाते. यामुळे गावाचा संपर्कच तुटतो.
गावाकडे जाणारे रस्ते बंद होतात. यावर्षीच्या पावसाळ्यात तीन वेळा गावाचा संपर्क तुटला आहे. तिसंगीमार्गे जाणाऱ्या एका बंधाऱ्यावरून गावकऱ्यांची जाण्या-येण्याची सोय होते, पण तेही धोकादायक आहे. जोपर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ गावातच अडकून पडतात.
टेकवाडी हे गाव उंच डोंगरावर आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी कधीही गावात शिरत नाही; परंतु पावसाळ्यात जेव्हा कुंभी व धामणी नद्यांना पूर येतो तेव्हा पुराचे पाणी या डोंगराच्या खालच्या बाजूवर येऊन आदळते. पाण्याच्या दाबामुळे डोंगराचा काही भाग खालून निखळत चालला आहे.
गगनबावडा तहसीलदार कार्यालयाने ही बाब लक्षात आल्यापासून टेकवाडीच्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचा पर्याय पुढे आणला आहे. तहसीलदार विकास भालेराव यांनी दोनवेळा ग्रामसभा घेऊन गावाच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी तिसंगी गावाजवळ पुनर्वसन करावे, अन्यथा नको, अशी भूमिका घेतली. घरे, शेतजमीन सोडून अन्यत्र जाण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे टेकवाडीची पुनर्वसन प्रक्रिया मध्येच थांबली आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात तहसीलदार कार्यालयातर्फे तात्पुरत्या पुनर्वसनाचे नियोजन केले जाते. यंदाही तिसंगी महाविद्यालयातील काही
खोल्यांत या ग्रामस्थांची तात्पुरत्या निवाऱ्याची, तसेच टॉयलेटची
सोय केली असतानाही ग्रामस्थांनी नकार दिला आहे.
टेकवाडीच्या गावकऱ्यांना दोन ग्रामसभा घेऊन संभाव्य धोका आणि पुनर्वसन याबाबत माहिती दिली आहे; परंतु त्यांचे असहकार्य मिळत आहे. गावाला पावसाळ्यात धोका आहे. पुराच्या पाण्याने गाव पूर्ण वेढले जाते. यंदाही पाण्याने वेढा दिलाय. त्यासाठी गावकऱ्याच्या सोयीसाठी एक फायबर मोटारबोट दिली आहे. धान्य व रॉकेलचा पुरवठा केला जातोय. पुराचे पाणी कधीही गावात शिरत नसले तरी डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विकास भालेराव,
तहसीलदार, गगनबावडा

Web Title: 'Takwadi' is not an issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.