आळते : टेम्पो उलटून वळिवडेची महिला ठार
By Admin | Updated: June 2, 2015 01:28 IST2015-06-02T01:28:38+5:302015-06-02T01:28:38+5:30
दहा जखमी : ‘धुळोबा’ला जात असताना अपघात

आळते : टेम्पो उलटून वळिवडेची महिला ठार
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी बलोरो पिकअप टेम्पो उलटल्याने गौराबाई बापू शेळके (वय ६०, रा. वळिवडे, ता. करवीर) ही महिला जागीच ठार झाली. या टेम्पोतील अन्य दहाजण गंभीर जखमी आहेत.
यामध्ये सहा महिला, तीन पुरुष, एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सर्व आळते येथील धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी चालले होते. हा अपघात सकाळी ११.३०च्या सुमारास झाला असून, सर्व जखमींवर हातकणंगले येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व हातकणंगले पोलिसांतून समजलेली माहिती अशी, वळिवडे (ता. करवीर) येथील शेळके कुटुंंबीय नातेवाइकांना घेऊन आळते येथील धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी चालले होते.
त्या ठिकाणी जात असताना रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर त्यांची बलोरो पिक-अप टेम्पो उलटला. काल रात्री पडलेल्या वळवाच्या पावसाने रस्त्याच्या कडेचा भाग निसरट झाला आहे, त्यामुळे चालकाचा ताबा सुटला असावा, असे काही जखमींनी सांगितले. या अपघातामध्ये राजाबाई गणपती शेळके (वय ६५), बापू बाळू शेळके (७०), संतोष चंद्रकांत शेळके, शोभा रंगराव शेळके, आक्काताई आनंदा शेळके, मंगल रामचंद्र मेटकर, आबासो भाऊसो शिंदे. (सर्व रा. वळिवडे, ता. करवीर) शेवंता नवलाप्पा पडवले (६०, रा. सौंदलगा, ता. चिकोडी), मंगल अशोक गावडे (४०, रा. कोरगाव, ता. वाळवा) प्रणाली प्रधान धनगर (११, रा. लाटवडे) आदी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. (प्रतिनिधी)