कोल्हापुरात फेरआरक्षण टाका
By Admin | Updated: July 6, 2016 01:10 IST2016-07-06T00:58:20+5:302016-07-06T01:10:37+5:30
--अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : शिवसेना--पर्चेस नोटीस प्रकरण --उपायुक्तांकडे मागणी
कोल्हापुरात फेरआरक्षण टाका
कोल्हापूर : पर्चेस नोटिसीची प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबाने राबविल्यामुळे महापालिकेच्या ताब्यातून सुटलेल्या सर्व जागांवर फेरआरक्षण टाकावे आणि महापालिकेच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेने मंगळवारी महापालिकेकडे केली. याचवेळी सेफ सिटी प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे ठरल्यामुळे शहराच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशीही मागणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा तसेच शहर शिवसेना शाखेचे एक शिष्टमंडळ मंगळवारी महानगरपालिका उपायुक्त विजय खोराटे यांना भेटले आणि पर्चेस नोटीस देऊन सोडविलेल्या आरक्षणाच्या जागा आणि सेफ सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत चर्चा केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
भ्रष्टाचाराचा परिपाक म्हणजे पर्चेस नोटीस देऊन आरक्षण उठविणे होय. या प्रकरणात पाच लोकांनी ३५ कोटींचा आंबा पाडला. त्यामुळे महानगरपालिकेच्या सभागृहाची बदनामी होत आहे.
जर ही मलिन प्रतिमा सुधारायची असेल तर प्रशासनाने आतापर्यंत सुटलेल्या सर्व जागांवर फेरआरक्षण टाकावे. तसा प्रस्ताव महासभेकडे मंजुरीकरिता पाठवावा; तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे या जागा आरक्षणातून वगळल्या गेल्या, त्या सर्वांवर फौजदारी दाखल करावी, असे पवार म्हणाले. आरक्षणातील जागा लाटण्यासाठी नियोजनपूर्वक टाकलेला हा दरोडा असल्याचा आरोप पवार यांनी केला.
सेफ सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार हा शहराच्या सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने संबंधित ठेकेदारास बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी कमलाकर जगदाळे यांनी केली. चार महिन्यांतच या प्रकल्पाची कार्यक्षमता स्पष्ट झाली. काम देण्यापूर्वी ठेकेदार कोण आहे, त्याची पात्रता काय आहे, कसले कॅमेरे बसविले आहेत याची तपासणी अधिकाऱ्यांनी का केली नाही? अशी विचारणा संजय पवार यांनी केली. वाहनांचे क्रमांक तसेच व्यक्तींचे चेहरे सुस्पष्ट दिसत नाहीत, कॅमेरे कमी दर्जाचे आहेत, अशी तक्रार हर्षल सुर्वे यांनी केली. या प्रकल्पात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे यांच्यात संगनमत झाल्याचा आरोप दुर्गेश लिंग्रस यांनी केला. शिष्टमंडळात रवी चौगुले, राजू जाधव, अवधूत साळोखे, राजू हुंबे, शशिकांत बीडकर, रणजित आयरेकर, राजेंद्र पाटील, रघुनाथ टिपुगडे, दिलीप देसाई, नरेश तुळशीकर, रफिक नायकवडी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
चौकशी सुरू : घोटाळ्याबाबत कारवाई करु
पर्चेस नोटीस घोटाळ्याची चौकशी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. पर्चेस नोटीस आल्यापासून यासंबंधीच्या प्रस्तावांना कोठे विलंब झाला, त्याला जबाबदार कोण, याची माहिती घेण्यात येत आहे.
चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त विजय खोराटे यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या ताब्यातून गेलेल्या जागांवर फेरआरक्षण टाकण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.