बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आचरणात आणा : गुरव
By Admin | Updated: April 23, 2015 00:56 IST2015-04-21T21:23:22+5:302015-04-23T00:56:33+5:30
बसवेश्वर व्याख्यानमाला

बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आचरणात आणा : गुरव
कोल्हापूर : टोकाची जातिव्यवस्था असतानाही संत बसवेश्वरांनी अकराव्या शतकात या जातिव्यवस्थेला विरोध करत समतेसाठी लढा दिला़ देव, देऊळ, पुरोहितशाही नाकारली़ श्रमिक संस्कृतीचा आदर करताना जातिभेद आणि लिंगभेदाविरोधात बंड पुकारले़ बसवेश्वरांच्या या कृतीचे आचरण करत लिंगायत समाजाने मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव यांनी केले़ संत बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्रातर्फे कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सोमवारी आयोजित बसव व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़ ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले अध्यक्षस्थानी होते़ गुरव म्हणाले, बसवेश्वरांनी विषमतेविरोधात संघर्षाचे तत्त्वज्ञान लिहिले होते़ मूर्तीपूजेला विरोध केला़ त्यांनी नेहमीच अनुभवावर आधारित तत्त्वज्ञानाची मांडणी केली़ त्यांच्या या तत्त्वज्ञानाचा प्रभाव वारकरी सांप्रदायावरही पडला़ त्यातून संत नामदेवांसारखे विद्वान संत निर्माण झाले़ ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, आधुनिक जगाकडे जात असताना सर्व जाती-धर्मातील महान पुरुषांच्या परंपरांकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे़ खंडप्राय देशातही आपण लोकशाही ज्या पायाच्या आधारावर मजबूत करू शकलो आहे, तो पाया अधिक मजबूत केला पाहिजे़ महापुरुषांनी दिलेले विचार आणि आजची आपली कृती यातील विसंगती खिन्न करणारी आहे़ प्राचार्य टी़ आऱ गुरव, लिंगायत समाज संस्था मंडळाचे अध्यक्ष बाबूराव तारळी, उपाध्यक्ष सदाशिव देवताळे उपस्थित होते़ चंद्रशेखर बटकल्ली यांनी प्रास्ताविक केले़ (प्रतिनिधी)