देवीचे दर्शन उद्या गर्भगाभाऱ्यातून घेऊ

By Admin | Updated: April 10, 2016 01:05 IST2016-04-10T01:05:40+5:302016-04-10T01:05:40+5:30

सुवर्णा तळेकर : अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशावरून उत्तर-प्रत्त्युत्तर

Take Goddess from tomorrow | देवीचे दर्शन उद्या गर्भगाभाऱ्यातून घेऊ

देवीचे दर्शन उद्या गर्भगाभाऱ्यातून घेऊ

कोल्हापूर : अंबाबाईच्या गर्भकुडीत राजघराण्यातील स्त्रिया, पुजाऱ्याच्या कुटुंबातील स्त्रिया, पुजारी पुरुष व इतर पुरुष जात असतात. संविधानाने व कायद्याने दिलेल्या हक्कानुसार उद्या, सोमवारी देवीचे दर्शन थेट गाभाऱ्यात जाऊन घेऊ, असा इशारा स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने निमंत्रक सुवर्णा तळेकर यांनी पत्रकाद्वारे शनिवारी दिला.
अंबाबाईच्या दर्शनाला सर्वसामान्य महिलांना अटकाव केला जातो. मात्र, राजघराण्यातील स्त्रिया व पुजाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना व इतर पुरुष मंडळींना गर्भकुडीत प्रवेश दिला जातो. हा सरळ भेदभाव आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी देवीच्या गर्भकुडीत जाऊन दर्शन घेऊ. या दर्शनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा उच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली जाईल. याबाबत १ एप्रिलला उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक ५५/२०१६ मध्ये मुख्य न्यायमूर्ती डी. एच. वाघेला व न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी एक आदेश काढला आहे.
या आदेशात सर्व मंदिरांत जिथे जिथे पुरुष जातील तिथे तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल रोहित देव व सरकारी वकील ए. बी. वग्यानी यांनी संविधानातील या अनुच्छेदांचा व उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र या जनहित याचिकेत सादर केले आहे. त्यामुळे आम्हालाही देवीचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेण्यास द्यावे, असे पत्रक सुवर्णा तळेकर, महिला फेडरेशनच्या मीना चव्हाण, अन्नपूर्णा महिला मंडळाच्या स्नेहल कांबळे, पानसरे विचार मंचच्या सीमा पाटील, रुपाली पाटील, अंबाबाई भक्त मंडळाच्या शरयू भोसले, समता संघर्ष समितीच्या प्रा. सुनीता अमृतसागर, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, जालिंदर जमादार, गिरीष फोंडे, मुकुंद कदम, धनाजी गुरव, अशोक जाधव, गौतम कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Web Title: Take Goddess from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.