शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या
By Admin | Updated: November 8, 2014 00:25 IST2014-11-08T00:06:16+5:302014-11-08T00:25:51+5:30
अशासकीय मंडळ : निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार मागणी

शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी समितीचे अशासकीय मंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. समितीवर अशासकीय मंडळ आल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेणे गरजेचे असते, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असे अशासकीय मंडळाचे म्हणणे आहे.
बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २००७ मध्ये झाली होती. या संचालकांचा कालावधी आॅक्टोबर २०१२ मध्ये पूर्ण झालेला आहे; पण शासनाने विविध कारणे पुढे करत बाजार समितीची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये शासनाने अशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. सध्या विधानसभा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला असून सहकारी संस्था व इतर संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार बाजार समितीची ही निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, अशा मागणीचा ठराव अशासकीय मंडळाने केला आहे. या ठरावानुसार निवडणुकीची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे केली जाणार असल्याचे अशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. निवास पाटील यांनी सांगितले.
मागणी करणारे पहिले अशासकीय मंडळ
आघाडी सरकारने जाता-जाता राज्यातील अनेक बाजार समित्यांवर अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती; पण बाजार समितीवर कार्यरत असणाऱ्या अशासकीय मंडळाकडून निवडणुकीची मागणी करणारे कोल्हापूर बाजार समितीचे राज्यातील पहिले अशासकीय मंडळ आहे.
मतदार यादीबाबत ‘पणन’चे मार्गदर्शन
बाजार समित्यांची मतदारयादी तयार करून दोन वर्षे झाली. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास नव्याने मतदारयादी बनवायची की जुनीच वापरायची, याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पणन संचालकांकडे म्हणणे मागितले आहे. साधारणत: ग्रामपंचायत विभागातील यादीच अद्ययावत केली जाऊ शकते.