समिती पहिल्या क्रमांकावर नेऊ

By Admin | Updated: August 12, 2014 00:46 IST2014-08-12T00:43:58+5:302014-08-12T00:46:33+5:30

आर. के. पोवार यांची ग्वाही : अशासकीय मंडळाने समितीची सूत्रे स्वीकारली

Take the committee to the first place | समिती पहिल्या क्रमांकावर नेऊ

समिती पहिल्या क्रमांकावर नेऊ

कोल्हापूर : शेतकरी, अडते, व्यापारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उत्त्पन्न वाढवून या समितीला राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर नेऊ, अशी ग्वाही अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी आज, सोमवारी येथे दिली. नेतेमंडळी आपल्याला एखादे मोठे महामंडळ देतील, अशी अपेक्षा होती; परंतु आपल्याला ‘ओव्हर टेक’ करून गेलेल्यांना ते मिळाले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बाजार समितीवर नियुक्त झालेल्या अशासकीय प्रशासक मंडळाने आज समितीचा पदभार स्वीकारला. प्रशासक डॉ. महेश कदम यांच्याकडून अध्यक्ष आर. के. पोवार व सहकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
आर. के. पोवार म्हणाले, हे क्षेत्र आपल्यासाठी नवीन असले तरी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन व बाजार समितीमधील सर्व घटकांना विश्वासात घेऊन कारभार करू. बाजार समितीला शिस्त लावण्यासाठी थोडा वेळ लागेल.
प्रा. निवास पाटील म्हणाले, प्रत्येकाचे झेंडे वेगळे असले तरी या ठिकाणी आता विकासाचाच झेंडा मानून काम करूया. घरातून भाकऱ्या बांधून आणून येथील कारभार करायचे आहे.
महापौर तृप्ती माळवी म्हणाल्या, बाजार समितीच्या कारभाराबाबत सर्वांनाच शंका आहेत; परंतु नवनियुक्त मंडळ पारदर्शक कारभार करून खरे उतरेल.
डॉ. महेश कदम म्हणाले, या ठिकाणी काम करायला वाव आहे. दहा महिन्यांच्या काळात प्रशासक म्हणून काम करताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले. नवनियुक्त मंडळही असेच काम करेल, असा विश्वास वाटतो.
माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, संस्था ही श्रेष्ठ आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनेच कारभार होणे गरजेचे आहे. चांगल्यासोबत मी आपल्याबरोबर आहे; परंतु गाडी रुळांवरून बाजूला झाली की आपण त्याला चाप लावू.
सदस्य मारुती पाटील म्हणाले, हे पद म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेसारखे आहे. त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे.
सदस्य सत्यजित जाधव म्हणाले, सामना किती षटकांचा आहे, हे पाहण्यापेक्षा काम चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, त्या दृष्टीने वाटचाल करावी.
सदस्य मधुकर जांभळे म्हणाले, अवधी थोडा असला तरी येथे लागलेला काळिमा धुऊन काढून चांगला कारभार करू.
नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, अस्तित्व दाखविण्याची ही संधी म्हणूनच या मंडळाने काम करावे. यावेळी सदस्य सूर्यकांत पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जि. प.चे माजी सदस्य राजाराम कासार यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक राजेश लाटकर यांनी स्वागत केले. सदस्य परशुराम खुडे यांनी आभार मानले.
यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत घाटगे, टी. बी. पाटील, किसन कल्याणकर, सुनील देसाई यांच्यासह सदस्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Take the committee to the first place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.