पंधरा दिवस काळजी घ्या, गाव कोरोनामुक्त होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:34+5:302021-06-03T04:18:34+5:30
गडहिंग्लज : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावानेच कठोर भूमिका घ्यावी. महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, १५ दिवस काळजी घ्या, ...

पंधरा दिवस काळजी घ्या, गाव कोरोनामुक्त होईल
गडहिंग्लज : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावानेच कठोर भूमिका घ्यावी. महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, १५ दिवस काळजी घ्या, आपलं गाव नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी बुधवारी ग्रामस्थांना दिला.
दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तालुक्यातील भडगाव, महागाव व नेसरी या गावांना भेट दिली. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामदक्षता समित्यांना विशेष सूचना दिल्या. भडगाव प्राथमिक शाळेतील अलगीकरण केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
बलकवडे म्हणाले, सौम्य लक्षणाच्या रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणातच ठेवा, संचारबंदीचा भंग करणारे व विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, प्रसंगी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा, निर्धारित वेळेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करा.
गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याकडून तालुक्यातील, तर भडगावचे सरपंच बसवराज हिरेमठ, ग्रामसेवक राजाराम घेवडे, महागावच्या सरपंच ज्योत्स्ना पताडे, नेसरीचे सरपंच आशिष साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील यांच्याकडून त्यांनी गावातील कोरोनास्थितीची माहिती घेतली.
यावेळी डीवायएसपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील व ग्रामदक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
--------------------------
*
तरुणावर विशेष लक्ष ठेवा
काही तरुण मुलं विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यांच्यामुळे कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे तरुणांवर विशेष लक्ष ठेवा. गावातून बाहेर जाणारे व गावात येणाऱ्यांच्या नोंदी ठेवा, अशी सूचना बलकवडे यांनी केली.
--------------------------
* मुमेवाडी कोविड सेंटरला भेट
मुमेवाडी (ता. आजरा) येथे मुकुंदराव आपटे फौंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड काळजी केंद्रालाही बलकवडे यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी केंद्राच्या कामाबद्दल जि. प. सदस्य उमेश आपटे यांचे कौतुक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, उपसरपंच सचिन उत्तूरकर, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याकडून तालुक्यातील कोरोनास्थितीची माहिती घेतली. यावेळी सरपंच बसवराज हिरेमठ, ग्रामसेवक राजाराम घेवडे, वसंत नाईक, उदय पुजारी, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०२०६२०२१-गड-०५