गणेशोत्सवात काळजी आणि लसही घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:11+5:302021-09-11T04:25:11+5:30
कोल्हापूर : कोरोनासोबतचा लढा संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करावे. ...

गणेशोत्सवात काळजी आणि लसही घ्या
कोल्हापूर : कोरोनासोबतचा लढा संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करावे. सध्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून, १८ वर्षांवरील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, पहिला डोस झालेल्यांनी प्राधान्याने दुसरा डोस घ्यावा व कोल्हापूर कोरोनामुक्त करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केले.
गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे कोल्हापूरकरांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, विघ्नहर्त्या गणरायाचे उत्साहाने स्वागत झाले आहे, पुढे आठ दिवस हा उत्सव आपण साजरा करीत असताना कोरोनाबाबतची खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.
पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या ९० हजार नागरिकांनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही. लसीकरणात राज्यात जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो. शासनाने कोल्हापूरसाठी अधिकाधिक लस दिली आहे. सध्या सर्वच आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. डिसेंबरपर्यंत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी असेही आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
--
२७ लाख लोकांनी घेतली लस
जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार १८ वर्षांवरील ३१ लाख २६ हजार ९१७ लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यापैकी १९ लाख ४६१ लोकांनी म्हणजे ६६ टक्के नागरिकांचा पहिला व ८ लाख ३० हजार ७१५ म्हणजे २७ टक्के जणांचा दुसरा डोस झाला आहे. आजवर २७ लाख ३१ हजार १७६ लोकांनी लस घेतली आहे.