२०१४ पूर्वीचे गुन्हे मागे घ्या
By Admin | Updated: March 17, 2015 00:07 IST2015-03-16T23:55:44+5:302015-03-17T00:07:32+5:30
टोलविरोधी कृती समिती : पोलीस अधीक्षकांकडे केली विनंती

२०१४ पूर्वीचे गुन्हे मागे घ्या
कोल्हापूर : टोल आंदोलन असो अथवा ऊस आंदोलन, अशा आंदोलनांत कार्यकर्त्यांवर २०१४ पूर्वी पोलिसांत जे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घ्यावेत, अशी विनंती सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने कसबा बावडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची दुपारी भेट घेतली.तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने, तसेच सत्ताधारी भाजप सरकारने २०१४ पूर्वी कार्यकर्त्यांवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात जे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घेणार, असा आदेश काढला आहे. हा आदेश होऊनही अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डॉ. शर्मा यांची भेट घेतली. समितीने पोलीस ठाण्यात असलेले दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यावर शर्मा यांनी, हा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितला आहे. तरीही याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन यावेळी दिले.
शिष्टमंडळात बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, रामभाऊ चव्हाण, दीपा पाटील, वैशाली महाडिक, अशोक रामचंदानी, अशोक पोवार, अॅड. पंडित सडोलीकर, लालासाहेब यादव, प्रसाद जाधव, श्रीकांत भोसले, राजेश बाणदार, बाबा महाडिक, राजवर्धन यादव, गौरव लांडगे, रवींद्र राणे, किसन कल्याणकर, अर्जुन नलवडे, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, सुजित पाटील, सुजित मोहिते, राजू कुरणे, आदींचा सहभाग होता.