मुरगूड गॅस एजन्सीवर कारवाई करा
By Admin | Updated: August 31, 2014 23:40 IST2014-08-31T23:16:22+5:302014-08-31T23:40:55+5:30
शिवसेनेची मागणी; तहसीलदारांना चौकशीचे आदेश

मुरगूड गॅस एजन्सीवर कारवाई करा
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील इण्डेन गॅस एजन्सीकडून ग्राहकांना व्यवस्थित गॅसपुरवठा होत नाही. गॅस ग्राहकांना नवीन नियम लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. देशपांडे यांनी कागल तहसीलदारांना या एजन्सीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुरगूडमध्ये इण्डेन गॅस या कंपनीची श्री बाळूमामा एजन्सी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. स्थापनेपासून अगदी वेळेवर सेवा पुरविणाऱ्या या एजन्सीकडून गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नवीन फतवा, नवीन नियम काढून ग्राहकांना हैराण केले आहे. सुरुवातीला २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेच सिलिंडर मिळत होते; पण काही महिन्यांपासून ३१ दिवस पूर्ण झाल्याशिवाय बुकिंग करून घेतले जात नाही. बुकिंगनंतर आठ दिवसांनी गॅसपुरवठा होतो. काही दिवसांपासून नवीन फंडा अंमलात आणला आहे. ग्राहकांनी कंपनीच्या नंबरवर आॅनलाईन बुकिंग करावे; त्याशिवाय आपल्याला सिलिंडर मिळणार नाही. या नियमामुळे शिक्षित लोकांची दमछाक होते; तर मग ज्यांच्याकडे मोबाईल नाही, अशा अशिक्षित ग्राहकांचे काय? या सर्वांमुळे कंपनीबाबत होत असलेल्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. देशपांडे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. याप्रश्नी कागलचे तहसीलदार यांनी लक्ष घालून या एजन्सीच्या कारभाराची चौकशी करावी व अहवाल पाठवावा, असा स्पष्ट आदेश पुरवठा अधिकाऱ्यांनी कागल तहसीलदारांना दिला आहे.