बोगस संस्थांवर कारवाई करा
By Admin | Updated: July 10, 2017 00:46 IST2017-07-10T00:46:21+5:302017-07-10T00:46:21+5:30
बोगस संस्थांवर कारवाई करा

बोगस संस्थांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : ‘गोकुळ’च्या ठरावासाठी गावोगावी काढलेल्या बोगस संस्था व त्यांच्या नावावर इतर संस्थांचे दूध घालणाऱ्या संस्थांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक निवास वातकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. उत्पादकांना सर्वाधिक दर देत असल्याचा डांगोरा दूध संघ पिटत आहे, पण प्रत्यक्षात उत्पादकांच्या पदरात किती रुपये दर पडतो, याची पोलखोल आगामी काळात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने म्हैस व गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचे आदेश दिले, पण ‘गोकुळ’ने शासनापेक्षा जादा दर असल्याचे कारण सांगत म्हैस दूध खरेदी दरात वाढ न करता गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली. देशात सर्वाधिक दर असल्याचा डांगोरा ‘गोकुळ’चे नेते पिटत आहेत, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. संघाकडून दूध संस्थांना मिळणारा दर व संस्थांकडून उत्पादकांना मिळणारा दर असे ‘गोकुळ’कडून दोन दर दिले जातात. या दोन्ही दरात मोठी तफावत पाहावयास मिळते. इतर सुविधा, दिवाळीचा दर फरकाच्या माध्यमातून उत्पन्नातील ८१ टक्के उत्पादकांना देत असल्याचा दावा संघ करते; पण दिवाळी दर फरक जाहीर करायचा प्रतिलिटर सव्वादोन रुपये आणि त्यातील २५ पैसे संस्थांच्या नावावर डिबेंचर्स म्हणून कपात करून घेतली जाते. संस्थांना दिला जाणारा व्यवस्थापन खर्चही यामध्ये धरला जात असल्याने संघाचा ८१ टक्क्यांचा दावा चुकीचा असून उत्पन्नातील ५० ते ५० टक्केच वाटा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पडत असल्याचे निवास वातकर यांनी सांगितले.
‘गोकुळ’ ने प्राथमिक दूध संस्थांत होणारी स्थानिक दूध विक्री सक्तीने बंद केली. पण ठरावाच्या राजकारणासाठी काढलेल्या
दूध संस्थांच्या नावावर राजरोसपणे दूध पाठविले जाते. एका-एका गावात पाच ते सहा संस्था अशाप्रकारच्या कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर दूध संघाने विक्री दरात वाढ केली तर खरेदी दरात आणखी दहा रूपयांची वाढ करावी, अशी मागणी वातकर यांनी केली.
पत्रकार परिषदेवेळी कृष्णात खाडे, भरत खाडे, राहुल खाडे, जनार्दन खाडे, सुशांत नाळे, संभाजी नाले, सरदार खाडे, सचिन नाळे, संभाजी वातकर, सर्जेराव मगदूम, सुनील यादव उपस्थित होते.
दर फरकात संस्थेकडून ढपला
‘गोकुळ’ दि.२१ जूनपासून गाय दूध दर फरक ३ जुलैला संस्थांच्या नावावर वर्ग केले आहे; पण सांगरूळमधील हरहर महादेव दूध संस्थेने ३३ हजारांचा हा फरक उत्पादकांना दिलेलाच नाही. त्याचबरोबर वासरू संगोपन अनुदानाचे सुमारे ८० हजार रुपये दडपून ठेवण्याचा प्रताप केल्याचा आरोप वातकर यांनी केला.