शिरगाव : हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड शेती पंप धारकांवर लादणाऱ्या राज्य महावितरण विद्युत कंपनीच्या खासगी ठेकेदारांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरगाव धामोड विभागांतर्गत येणाऱ्या शेकडो शेतीपंपधारकानी शिरगाव कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अक्षय टकसाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, महावितरण विद्युत कंपनी अंतर्गत खासगी ठेकेदार हे शेतीपंपाचे रिडिंग व वीज देयके दर तीन महिन्यांनी शेतीपंपधारकांना देतात. परंतु, तब्बल एक वर्ष झाले तरी या ठेकेदारांनी वीज देयके न पाठविता घरी बसून अंदाजे शेतीपंपांची रिडिंग घेतली आहेत. महावितरण कंपनीनेही थकबाकीची रक्कम न भरल्यास शेती वीजपंपाची वीज तोडण्याचा इशारा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अंदाजे वीजबिल रिडिंग घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर सिताराम भोईटे , पांडुरंग यादव, विलास यादव यांच्यासह शेकडो शेतीपंपधारकांच्या सह्या आहेत.
वीज वितरणच्या खासगी ठेकेदारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST