‘हमीदवाडा’वर कारवाई करा

By Admin | Updated: December 9, 2014 23:17 IST2014-12-09T23:06:17+5:302014-12-09T23:17:26+5:30

वायू, पाणी प्रदूषणाचा आरोप : चौकशी होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची मोर्चाद्वारे मागणी

Take action against 'Hameedwara' | ‘हमीदवाडा’वर कारवाई करा

‘हमीदवाडा’वर कारवाई करा

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्यामुळे वायू व पाणी प्रदूषण होत आहे. या कारखान्यांवर कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा हमीदवाडा परिसरातील नागरिकांनी आज, मंगळवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला. चौकशी होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा आग्रहही शिष्टमंडळाने प्रदूषण मंडळाकडे धरला.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सहा महिने बॉयलरमधून फवारल्या जाणाऱ्या काजळीमुळे परिसरात काजळीचे आच्छादन तयार होते. ही काजळी पिण्याचे पाणी व घरात येत असल्याने नागरिकांना टीबी, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत आहे. शेतीवरही याचा अनिष्ट परिणाम झाला आहे. वारणा कारखान्यांप्रमाणे ‘ई.सी.पी.’ प्रणाली बसवण्यासाठी कारखान्याला सक्ती करावी, अशी मागणी विकास पाटील यांनी केली. कारखान्याच्या स्पेंट वॉशमुळे होणारे पाणीप्रदूषण अतिशय गंभीर आहे. कारखान्यापासून वेदगंगा व चिकोत्रा नदी जवळ असल्याने या दोन्ही नद्यांतून प्रदूषित पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी गॅस्ट्रोसारखे गंभीर रोग पसरत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रकल्पाची स्पेंट वॉश डिस्चार्ज बंद करण्यासाठी तशी यंत्रणा बसवावी, पंधरा दिवसांत हा परिसर प्रदूषणमुक्त करावा व ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आपण कारखान्यावर कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागूच पण रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शिष्टमंडळाने यावेळी दिला. या मागणीचे निवेदन उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अरुण भोसले, नंदकुमार पाटील, प्रवीण भोसले, ज्ञानदेव पाटील, महादेव पाटील, प्रदीप पाटील, हणमंत माने, रणजित पाटील, मुन्ना पिरजादे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दूषित पाण्यासह निवेदन
निवेदन देण्यासाठी कागल तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उद्योग भवन येथील प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात आले होते. नागरिकांची संख्या अधिक असल्याने उपप्रादेशिक अधिकारी होळकर निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले. त्यांना निवेदनाबरोबर दूषित पाण्याची बाटलीही देण्यात आली.


आठ दिवसांत चौकशी करणार : होळकर
हमीदवाडा कारखान्यातून नदी व परिसरात प्रदूषण होत असलेल्या तक्रारीनुसार येत्या आठ दिवसांत संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यामध्ये कारखाना प्रशासन दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.

Web Title: Take action against 'Hameedwara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.