लेखाधिकाऱ्यावर कारवाई करणार
By Admin | Updated: November 12, 2014 23:59 IST2014-11-12T20:41:47+5:302014-11-12T23:59:10+5:30
मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही : अकौंटंटच्या सर्वच कर्मचाऱ्यांची बदलीची मागणी

लेखाधिकाऱ्यावर कारवाई करणार
इचलकरंजी : नगरपालिकेकडील मक्तेदारांना बिलांच्या रकमा अदा करण्यासंदर्भात लेखाधिकारी महादेव गोरडे अपमानास्पद वागणूक देतात. त्यांची बदली अन्यत्र करावी, या मागणीचा पुनरुच्चार मक्तेदारांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सत्तारूढ व विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे गोरडे यांच्या बदलीबाबतचा निर्णय उद्या, गुरुवारी दिला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, स्वाभिमानी कामगार संघटनेच्यावतीने कामगार नेते व नगरसेवक संभाजीराव काटकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना एक शिष्टमंडळ भेटले. लेखाधिकारी गोरडे हे गेली तीन वर्षे कामकाज पाहत आहेत. गोरडे यांच्यावर केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. मात्र, अचानकपणे मक्तेदारांनी त्यांची बदली मागणे योग्य नाही. कोणताही आकस न ठेवता गोरडे यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच अकौंटंट विभागाकडे कार्यान्वित असलेल्या सुमारे २१ कर्मचाऱ्यांनी मक्तेदार अकौंटंट विभागाची बदनामी करीत आहेत. दबावतंत्रावरून लेखाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास अकौंटंट विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी या विभागातील कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांच्याकडे केली. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.
लेखाधिकारी गोरडे हे मक्तेदारांची बिले अदा करताना किंवा बयाणा रक्कम परत करतेवेळी उद्धटपणे बोलतात. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबद्दल पालिकेकडील सुमारे ३५ मक्तेदारांनी ५ नोव्हेंबरला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. अन्यथा काम बंद करण्याचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)
आज योग्य निर्णय घेणार
मक्तेदारांनी दिलेली मुदत संपत असल्याने सर्व मक्तेदार नगराध्यक्षांच्या दालनात आले. त्यांनी लेखाधिकारी गोरडे यांच्या बदलीसंदर्भात कारवाई अद्याप झाली नसल्याबद्दल काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बोलताना मुख्याधिकारी पवार यांनी गोरडे यांना नोटीस दिली आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून, ही मुदत बुधवारी संपत आहे. उद्या, गुरुवारी त्यांच्यावरील कारवाईचा योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.