फसवणूक करणाऱ्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:26+5:302021-09-10T04:31:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत प्रांत कार्यालयासमोर व स्वामी अपार्टमेंटजवळ या दोन ...

फसवणूक करणाऱ्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत प्रांत कार्यालयासमोर व स्वामी अपार्टमेंटजवळ या दोन ठिकाणी जागा निश्चित केली. मात्र, स्वामी अपार्टमेंटजवळील क्रीडांगणाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप संघटनेच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत केला. यावेळी संबंधित अभियंत्यास धारेवर धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
नगरपालिकेत २५ वर्षे सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त १४३ सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मोफत घरकुल बांधून देण्यासाठी दोन ठिकाणी जागा निश्चित करण्याचा निर्णय ३० ऑगस्टला नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला, तसेच घर बांधण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार करून पालिकेच्या सभेसमोर ठेवणे आणि आस्थापनावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यावरही एकमत झाले; परंतु स्वामी अपार्टमेंटजवळील जागेची प्रत्यक्षात पाहणी केली असता या ठिकाणी क्रीडांगणाचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या प्रतिनिधींनी थेट नगराध्यक्षाची भेट घेतली.
पालिकेला खोटी माहिती दिल्याबद्दल अधिकारी रणजित कोरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रतिनिधींनी केली. या जागेवर बांधकाम सुरू असल्याची कल्पना नव्हती, तसेच यासंदर्भात बांधकाम विभागाकडूनही तशी माहिती मिळाली नसल्याचे अभियंता कोरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अण्णा कागले, प्रा. ए. बी. पाटील, सुभाष मालपाणी, पांडुरंग कोकरे, संजय कांबळे, धनंजय पळसुले, नौशाद जावळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०९०९२०२१-आयसीएच-०३
फसवणूक करणाऱ्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे केली.