कोल्हापूर : वाशी (ता.करवीर) येथे सरदार रानगे या भोंदूबाबाकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्याच्या अंधश्रद्धा, जादूटोणा व फसवणुकीच्या व्यवसायाची सखोल चौकशी करावी, आर्थिक व्यवहारांची तपासणी करून बेकायदेशीर संपत्ती जप्त करावी, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा नोंद करावा, अशी मागणी मंगळवारी वाशी ग्रामस्थ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली.ग्रामस्थ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांना याबाबतचे निवेदन दिले. यात वाशी येथे भोंदू बाबांनी दरबार भरवून आपले प्रस्थ वाढवले आहे. या माध्यमातून गेल्या पाच वर्षात लोकांची आर्थिक लूट केली आहे. पोलिस रेकॉर्डवरील गुंड, स्थानिक पोलिस निरीक्षक व राजकीय लोकांच्या मदतीने संरक्षण मिळवत आहे. त्याने ग्रामस्थांवर तलवार हल्ला केल्याचे सीसी फुटेज सादर करून व पोलिस प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. रानगेच्या दरबारात येणाऱ्या पीडित लोकांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी व त्यांचे प्रबोधन करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी किरण गवळी, बाळू माळी, सुनील गायकवाड व वाशीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Kolhapur: वाशीतील भोंदूबाबा सरदार रानगेवर कारवाई करा; ग्रामस्थ, अंनिसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:26 IST