तजेलदार वांगी ‘पावणेदोन लाखांची’
By Admin | Updated: March 9, 2015 23:48 IST2015-03-09T22:32:50+5:302015-03-09T23:48:17+5:30
पाच महिन्यांत पीक : कोथिंबीर, वरणा, दोडका आंतरपिके; आडूर येथील शेतकरी संभाजी भोसले यांचा प्रयोग

तजेलदार वांगी ‘पावणेदोन लाखांची’
प्रकाश पाटील- कोपार्डे -घरगुती भोजनावळ असो वा मोठमोठे समारंभ, प्रत्येक कार्यक्रमांत शाकाहारी भोजनामध्ये वांग्याच्या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतांश वेळा या भोजनावळीत वांग्याची भाजी असतेच. सर्वसामान्यांपासून उच्चवर्गीयांच्या पसंतीला ही भाजी नेहमीच उतरलेली असते. आसपासच्या बाजारपेठांचा अंदाज घेऊन भाजीवर्गीय कोणते पीक घ्यावयाचे याचे तंतोतंत नियोजन व स्वत:च मार्केटिंग करून त्यातून योग्य भाव मिळविण्याचे तंत्र आडूर (ता. करवीर) येथील बहुतांश शेतकऱ्यांकडे आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोन-अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावातील संभाजी चंदर भोसले यांनी आपल्या १६ गुंठे क्षेत्रात केवळ पाच ते सहा महिन्यांत पावणेदोन लाखांचे उत्पन्न ‘वांगी’ या भाजीवर्गीय पिकातून घेतले आहे. वांग्याच्या पिकाचे नियोजन करताना संभाजी भोसले यांनी मे, जून महिन्यांत दोन वेळा ट्रॅक्टरने शेतजमिनीची नांगरट केली. त्यानंतर साडेतीन फुटांची सरी सोडून ठेवली. हे क्षेत्र माडे (पडीक) राहू नये यासाठी यात भेंडीची लावणी केली; मात्र वांग्याचे मुख्य पीक घेण्याचे नियोजन असल्याने आॅगस्ट महिन्यात जयसिंगपूर येथून रोपवाटिकेतून ‘शिरगाव काटा’ जातीच्या वांग्याची ४ हजार रोपे ५० पैसेप्रमाणे खरेदी केली. दीड फूट अंतराने झिगझॅक पद्धतीने रोपांची लावणी केली. लावणी करीत असताना वांग्याच्या रोपांना मर लागू नये यासाठी बाविस्टीन, ह्युमिक अॅसिड यामध्ये रोपांची मुळे बुडवून त्यांची लावणी केली. तीन दिवसांनी पुन्हा आळवणी घेतली. रोपांनी जमिनीत मूळ धरल्यानंतर प्रतिरोपाला २१व्या दिवशी डी.ए.पी. १०० ग्रॅम दिले. अवघ्या दीड महिन्यात झाडांची उंची पाच फुटांपर्यंत पोहोचली. या दरम्यान, झाडे फुलावर आली. फलधारणा झपाट्याने झाल्याने दीड ते पावणेदोन महिन्यांतच पहिला वांग्याचा तोडा मिळाला.
वांग्याचे फळ अत्यंत वजनदार व आकर्षक असल्याने बाजारात घेऊन गेल्यानंतर झटपट विक्री होत होती. लावणी झाल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या महिन्यांत डी.ए.पी. प्रति झाडाला १०० ग्रॅम दिल्याने व फलधारणेवर परिणाम होऊ नये यासाठी निंबोळी पेंड, झिंक सल्फेट, पोटॅश अशी दुय्यम अन्नद्रव्यही दिली. शेंडेआळीमुळे रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून दर पंधरा दिवसांनी ‘कॅलडॉन’ कीटकनाशकबरोबर बुरशीनाशक, बाविस्टीन, रिडोमिल यांच्या फवारणी केल्या. दिवसाला ७० ते ८० किलो वांगी मिळत होती. दरम्यान, वांग्याला कधी ३० रुपये, तर कधी ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. दिवसाला किमान दोन हजार रुपयांची वांगी विक्री करीत होतो.
भोसले यांच्या पत्नी अनिता याही वांगी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर विक्री करीत. वांगी ताजी व तजेलदार असल्याने त्याचा बाजारात उठावही मोठ्या प्रमाणात होत होता. गुरुवारी सांगरूळ (ता. करवीर) व शनिवारी कळे (ता. पन्हाळा) येथे बाजाराचा दिवस असल्याने तेथे किमान तीन हजार रुपयांची वांगी विक्री होत.
वांग्याच्या प्रतिझाडापासून पाच सप्टेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या पाच महिन्यांत किमान ५० ते ६० हजार रुपये वांग्याचे उत्पन्न मिळाले. चार हजार झाडांचा विचार केल्यास खर्च वजा जाता किमान एक लाख ६० हजार ते पावणेदोन लाख रुपयांचे वांग्यातून उत्पन्न मिळाले.
गावात शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवितात. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर गेली पाच-सहा वर्षे वांगी, भाजीपाला, दोडका, वरणा अशी पिके घेऊन ती स्वत:च विक्री करीत असल्याने योग्य दरही मिळतो. मात्र, याला वेळचे वेळी लक्ष देऊन काम करावे लागते. पत्नी अनिताची यासाठी चांगली साथ मिळाली. - संभाजी भोसले, शेतकरी, आडूर (ता. करवीर)
सध्या वांग्याचा बहार कमी आहे. वांग्यामध्ये आंतरपीक म्हणून ‘सरपंच’ वाणाचा वरणा व १६ गुंठ्यांच्या सभोवती काठीचा आधार निर्माण करीत दोडका केला आहे. सध्या वांग्याचा बहार कमी आला असला तरी वरणा व दोडक्याच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे.