श्रद्धा पवारची कसून चौकशी

By Admin | Updated: September 27, 2015 00:27 IST2015-09-27T00:24:31+5:302015-09-27T00:27:47+5:30

पानसरे हत्याप्रकरण : दोन दिवसांपूर्वी फोंडा-गोव्यातून घेतले होते ताब्यात

Swarad Pawar's thorough investigation | श्रद्धा पवारची कसून चौकशी

श्रद्धा पवारची कसून चौकशी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याची फोंडा-गोवा येथील ‘सनातन’च्या आश्रमात राहणारी मैत्रीण श्रद्धा पवार हिच्याकडे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून कसून चौकशी करून तिला सोडून दिले आहे; परंतु तिला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल सीमकार्ड तसेच मोबाईल संभाषणावरून फोंडा-गोवा येथील ‘सनातन’ची साधक श्रद्धा पवार ही त्याची मैत्रीण आहे, असे आढळले. तिच्याशी त्याने मोबाईलवरून अनेकवेळा संपर्क साधल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी पथकाने गोवा येथून तिला ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. पोलीस मुख्यालयात तिच्याकडे दोन दिवस कसून चौकशी केली. तिचा जबाब नोंदवून तिला सोडून दिले होते; परंतु तिला गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत गायकवाडकडे चौकशी सुरू होती.
संशयित आरोपी समीर गायकवाड याला शनिवारी न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला कडक बंदोबस्तात एका गाडीतून बुरखा घातलेल्या अवस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी थेट सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे सीपीआर रुग्णालय परिसरात अचानक लागलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली. दुपारी या २० मिनिटांच्या कालावधीत ‘सीपीआर’मध्ये काही वाहनांनाही प्रतिबंध करण्यात आला होता. समीरची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात नेण्यात आल्यानंतर ‘सीपीआर’मधील बंदोबस्त कमी करण्यात आला.

 

Web Title: Swarad Pawar's thorough investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.