स्वनिधी स्वच्छता अभियानासाठी
By Admin | Updated: November 25, 2014 23:49 IST2014-11-25T23:43:39+5:302014-11-25T23:49:01+5:30
परशराम तावरेंंचा पुढाकार : अकरा लाखांतून घमेली, खोरे, मास्क खरेदी

स्वनिधी स्वच्छता अभियानासाठी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतून मिळणारा ११ लाखांचा स्वनिधी हा वैयक्तिक कामांसाठी न घेता तो स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे यांनी घेतला आहे. त्यांनी त्याबाबतचे लेखी पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या संपूर्ण भारत स्वच्छता अभियानासाठी स्वत:चा निधी खर्च करणारा राज्यातील एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज तावरेंकडे पाहिले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण भारत स्वच्छता अभियान सुरू केले आहे. गावपातळीवर, शासकीय कार्यालय, आदी ठिकाणी व्यक्ती, संस्था, शाळा, महाविद्यालयीन युवक, लोकप्रतिनिधी, आदी सर्वजण या अभियानात स्वच्छतेचे काम करीत आहेत.
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्हा परिषद सदस्य तावरे यांनी स्वत:चा स्वनिधी ११ लाख रुपये अभियानासाठी खर्च करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनास कळविले आहे. त्या निधीतून घमेली तीन हजार १८०, खोरे तीन हजार १८०, चेहऱ्यास लावायचे मास्क २५ हजार, हातमोजे ५० हजार, दांडा झाडू तीन हजार १८०, असे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. हे साहित्य जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांना दिले जाणार आहे.
जिल्हा परिषदेत निधी मंजूर करण्यासाठी अनेक सदस्यांच्यात चढाओढ असते. परंतु, तावरे यांनी स्वत:चा
स्वनिधी स्वच्छता अभियानासाठी खर्च करण्याचे धाडस दाखवून समाजामध्ये वेगळा आदर्श रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या आदर्श कामगिरीचे जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांतून कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)