खत दरवाढीविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:48+5:302021-05-19T04:23:48+5:30
जयसिंगपूर : केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. गुरुवारी (दि. २०) केंद्र सरकारचा ...

खत दरवाढीविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार
जयसिंगपूर : केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. गुरुवारी (दि. २०) केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज, बुधवारपासून लाखो शेतकरी दरवाढ मागे घ्या अशा आशयाचे पत्रही लिहतील, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेले होते. केंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. नव्या दरामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे.
रासायनिक खतांच्या किमतीत ५० ते ६० टक्के दरवाढ झालेली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकऱ्यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बांधावरून तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन केले जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.