‘स्वाभिमानी’ स्वबळावर

By Admin | Updated: January 18, 2017 01:10 IST2017-01-18T01:10:08+5:302017-01-18T01:10:08+5:30

राजू शेट्टी : आमच्या विरोधकांची भाजपमध्ये भरती; निवडणुकीनंतरच आघाडी

'Swabhimani' on self! | ‘स्वाभिमानी’ स्वबळावर

‘स्वाभिमानी’ स्वबळावर



कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात आम्ही भाजपप्रणित महाआघाडीचा घटक असलो तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय खुला आहे. आम्ही स्वबळाची तयारी केली असून निवडणुकीनंतर भाजपशी की काँग्रेसशी आघाडी करायची याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली. भाजपमध्ये आमच्या विरोधकांची भरती सुरू असून निवडणुकीबाबत त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ जवळ आली तरी भाजपकडून आम्हाला अजून आघाडीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. त्या पक्षाच्या नेत्यांना ‘स्वाभिमानी’शी चर्चा करायला कमीपणा वाटत असेल तर आम्हालाही सर्व राजकीय पर्याय खुले आहेत. गेल्या निवडणुकीतही आम्ही स्वबळावर लढलो होतो. यावेळेला सर्वच पक्षांची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना दहा जागा चिन्हांवर निवडून आणतानाही तोंडाला फेस येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या मागे न जाता स्वबळावर जास्त जागा निवडून आणू व त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत आमची जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत आघाडी होती, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढलो; परंतु जिल्हा परिषदेतील सत्तेवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. काँग्रेसने पाच वर्षे सत्तेत वाटा देण्याचा ‘शब्द’ प्रामाणिकपणे पाळला. त्यामुळे चांगला प्रस्ताव आल्यास आम्ही त्यांच्यासोबतही आघाडी करू शकतो. आम्ही संघटना म्हणून ज्यांच्या विरोधात लढलो, लढत आहोत, अशांच्या गळ््यात गळे घालून भाजपचे नेते त्यांना पक्षात घेत आहेत. त्यामुळे अशा पक्षांशी आघाडी तरी कशी करायची; अशी विचारणा स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते करू लागल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: 'Swabhimani' on self!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.