‘स्वाभिमानी’कडून ‘हेमरस’चे व्यवस्थापन धारेवर
By Admin | Updated: November 28, 2014 00:13 IST2014-11-27T20:59:00+5:302014-11-28T00:13:33+5:30
राजेंद्र गड्ड्यान्नावर : ऊसदराबाबत तोडगा न निघाल्यास उद्यापासून ऊस वाहतूक रोखणार

‘स्वाभिमानी’कडून ‘हेमरस’चे व्यवस्थापन धारेवर
चंदगड : चंदगड तालुक्यातील हेमरस व इको शुगर केन साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ न करता उत्पादन खर्चाच्या आधारावर दर द्यावा व गेल्या वर्षाचा ३८० रुपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजगोळी खुर्द येथे रास्ता रोको केला.
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसांत ऊसदराबाबत निर्णय न झाल्यास शनिवार (दि. २९)पासून ‘हेमरस’ला होणारी ऊस वाहतूक रोखण्याचा इशाराही देण्यात आला.
‘स्वाभिमानी’चे तालुकाप्रमुख राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली राजगोळी खुर्द येथे झालेल्या आंदोलनात गड्ड्यान्नावर यांनी कारखाना प्रशासनाला इशारा देताना ऊसदराबाबत ‘एफआरपी’ची अट मान्य नसल्याचे सांगून स्वामीनाथन समितीने सूचविलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारावर दर देण्याची मागणी केली. एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देणे कारखान्याला शक्य असल्याचे गड्ड्यान्नावर यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत कारखान्याने याबाबत निर्णय न घेतल्यास कारखान्याला होणारी ऊस वाहतूक रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी नवनीत पाटील, प्रा. दीपक पाटील, लक्ष्मण कडोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हेमरस’च्या वतीने भूमिका मांडताना कंपनी एच. आर. भरत कुंडल यांनी कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर केल्याचे सांगून गेल्यावर्षीचा राहिलेला ३८० रुपयांचा हप्ता सॉफ्ट कर्ज मिळाल्यानंतर देण्यात येईल, असे सांगून कारखान्याच्या वजन काट्यात कोणताही दोष नसल्याचे सांगितले.