‘स्वाभिमानी’ही ‘केडीसीसी’च्या रिंगणात
By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T01:04:21+5:302015-04-07T01:22:40+5:30
राजू शेट्टी : चांगल्या लोकांना बरोबर घेऊन बँक वाचविणार

‘स्वाभिमानी’ही ‘केडीसीसी’च्या रिंगणात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे यांनी विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून विकास सेवा संस्था गटातून, सावकर मादनाईक यांनी प्रक्रिया संस्था, तर विठ्ठल मोरे यांनी नागरी बॅँक गटातून अर्ज दाखल केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह आणखी कार्यकर्ते मंगळवार व बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, जिल्हा बॅँक ही सर्वसामान्य माणसांची बॅँक आहे. विविध संस्थांचे रिझर्व्ह फंड, भागभांडवल या बॅँकेत गुंतले आहेत. या निधीवरील लाभांश व व्याजातून प्राथमिक संस्थांचा खर्च भागत होता; पण गेले दहा वर्षे लाभांश मिळत नसल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. नेते मंडळींच्या खाबूगिरीमुळे संस्था मोडीत निघाल्या आहेत. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक नको प्रशासकच हवा, अशी एकमुखी मागणी केली असताना याच मंडळींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उड्या सुरू आहेत. जिल्हा बॅँकेत या लोकांचा आत्मा गुंतल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.
जिल्हा बॅँक म्हणजे ग्रामीण विकासाचे मंदिर आहे; पण या मंडळींनी राजकारणाचा अड्डा बनविल्याने सामान्य माणूस अडचणीत आला. शेतकरी संघटनेने अर्ज दाखल केले आहेत, सभासदांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पहावे लागेल. वेळ प्रसंगी जिल्हा बॅँकेच्या भल्यासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी बेहत्तर, पण बॅँक वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘राजें’चे स्वागतच!
विक्रमसिंह घाटगे यांनी जिल्हा बँकेत यावे, याबाबत विचारले असता, जिल्ह्यात अनेक संस्था चांगल्या चालल्या आहेत. बॅँकेच्या भल्यासाठी अशा मंडळींनी पुढे यायलाच हवे, विक्रमसिंह घाटगे यांचे स्वागतच करू, असे शेट्टी यांनी सांगितले.
मोडीत काढणारेच वाचविण्यास पुढे
ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली, त्याच मंडळींचा अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळली आहे. बॅँक मोडीत काढणारेच वाचविण्यासाठी पुढे असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली.
खरेदी-विक्रीला बळी पडू नका
चांगली माणसे निवडणुकीत उतरली नाही, तर ज्यांनी बॅँक संपविली तीच मंडळी पुन्हा सत्तेवर येतील. माझे ठरावधारकांना आवाहन आहे, त्यांनी मतांची खरेदी-विक्री करू नये, चांगल्या माणसांना पाठवावे, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
‘गोकुळ’बाबत योग्य वेळी भूमिका
जिल्हा बॅँकेत आम्ही उतरलोच आहे, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.