‘स्वाभिमान’चे प्रदेश संघटक अपघातात ठार
By Admin | Updated: July 21, 2014 00:40 IST2014-07-21T00:33:56+5:302014-07-21T00:40:21+5:30
राणेंना भेटले होते : कंटेनरने धडक दिल्याने अपघात

‘स्वाभिमान’चे प्रदेश संघटक अपघातात ठार
देवरूख : संगमेश्वरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर उक्षी-मानसकोंड येथे झालेल्या फॉर्च्युनर गाडी आणि कंटेनर यांच्यातील अपघातात स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष शंकर पाटील (वय ४२), आणि अश्विन नागेश पाटील (२७, दोघे रा. सोलापूर) ठार झाले.
हा अपघात आज, रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. कणकवली (सिंधुदुर्ग) येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत असलेला स्नेहमेळावा आटोपून येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सुभाष पाटील व अश्विन पाटील हे दोघेजण फॉर्च्युनर गाडी (एमएच १३ बीएन ५५५५) घेऊन नारायण राणे यांना भेटण्यासाठी कणकवली येथे गेले होते. नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणारा स्नेहमेळावा आटोपून ते परतत होते. त्यांची गाडी उक्षी-मानसकोंडयेथे आली असता तिने पुढील वाहनाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुढील गाडी ओलांडण्यापूर्वीच समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरवर (एमएच ०८/एच २८४८) ही गाडी जाऊन आदळली. अपघात एवढा मोठा होता की, फॉर्च्युनर गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुभाष व अश्विन पाटील यांचे या अपघातात जागीच ठार झाले.अपघातग्रस्त गाडी सागर कर्णेकर (२८) हा चालवीत होता. दरम्यान, या दोघांच्या मृतदेहांचे विच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याबाबतची फिर्याद नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.(प्रतिनिधी)
---अपघातातील मृत सुभाष पाटील हे स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक तसेच ‘मनसे’चे सोलापूरचे माजी शहराध्यक्ष होते. ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे राणे यांची भूमिका ऐकून घेण्यासाठी ते कणकवलीत गेले होते. पाटील यांनी वर्षभरापूर्वी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून १० हजार लोकांसाठी रोजगार मेळावाही आयोजित केला होता.