वहिफणी कामगाराचा संशयास्पदरित्या मृत्यू
By Admin | Updated: November 22, 2015 00:35 IST2015-11-22T00:17:33+5:302015-11-22T00:35:03+5:30
इचलकरंजीतील घटना : चेहरा कुत्र्यांनी कुरतडला

वहिफणी कामगाराचा संशयास्पदरित्या मृत्यू
इचलकरंजी : येथील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयानजीक रिकाम्या जागेत पहाटेच्या सुमारास एका वहिफणी कामगाराचा मृतदेह आढळून आला. राजू नदाफ (वय ३५, रा. हनुमानगर-जवाहरनगर) असे मृताचे नाव आहे. मद्यसेवनाने लिव्हर खराब होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच मृतदेहाचा चेहरा भटक्या कुत्र्यांनी कुरतडला असावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शनिवारी पहाटे ५.३०च्या सुमारास एका व्यक्तीस परिसरातील मैदानातून जात असताना एक व्यक्ती पालथी पडली असल्याचे निदर्शनास आले. त्याने जवळ जाऊन पडलेल्या व्यक्तीस सरळ केले असता त्याचा विद्रुप चेहरा पाहून तो भीतीने पळून गेला आणि या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संजय साळुंखे पथकासह दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची तपासणी आणि आसपासच्या नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी एका व्यक्तीने हा मृतदेह राजू नदाफ यांचा असल्याचे सांगितले.
त्यावर पोलिसांनी नदाफ यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांचा मुलगा अल्ताफ नदाफ याला घटनास्थळी आणले. त्यावेळी त्याने हा मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे ओळखले. नदाफ यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे लिव्हर खराब होऊन मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हा खून आहे की, घातपात? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)