‘भोगावती’ निवडणूक स्थगितीबाबत संदिग्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:14 IST2017-01-21T00:14:37+5:302017-01-21T00:14:37+5:30
सहकार विभागाची अद्याप सूचनाच नाही : सभासदांच्या नजरा आदेशाकडे

‘भोगावती’ निवडणूक स्थगितीबाबत संदिग्धता
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक स्थगितीबाबत शुक्रवारीही सहकार विभागाकडून कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार की थांबणार याबाबत सभासदांमध्ये संदिग्धता कायम आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘भोगावती’ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात ‘अ’ वर्ग संस्थेची निवडणूक जाहीर करता येत नाही, असा सहकारात कायदा आहे. याविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याबाबत सहकार विभागाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. सहकार विभागाने निवडणुकीला मार्चपर्यंत स्थगिती दिल्याची चर्चा गुरुवारी जिल्ह्यात धडकली. याबाबत सहकारमंत्र्यांनी दुजोरा दिला नसला तरी काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत असल्याने जिल्ह्यात संभ्रमावस्था पसरली आहे. शुक्रवारी सहकार विभागाकडून काहीतरी आदेश येईल, असे वाटत होते. या निर्णयाकडे सभासदांच्या नजरा लागल्या होत्या.
सहकार खात्याकडून घेण्यात येणारा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे येणार आहे. सहसंचालक कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांना मार्गदर्शन करणार आहेत; पण अद्याप कोणताच आदेश आला नसल्याने निवडणुकीबाबत संदिग्धता कायम राहिली आहे.
छाननीवर दोन तक्रारी !
कारखान्यासाठी दाखल झालेल्या अर्जावर बुधवारी (दि. १८) छाननी झाली. त्यामध्ये अपात्र ठरविलेल्यांपैकी दोघांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली आहे. ऊस पुरवठा नसल्याने अर्ज अपात्र ठरविल्याबाबत ही तक्रार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार : धैर्यशील पाटील
भोगावती : भोगावती साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पार पाडावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती शंतनू केमकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शेकापच्यावतीने निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे, अशी माहिती भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनावर धैर्यशील पाटील-कौलवकर, नामदेव पाटील, हंबीराव पाटील, अशोकराव पवार -पाटील, केरबा भाऊ पाटील, प्रा. किसन चौगले, प्रा. पांडुरंग डोंगळे, संभाजी पाटील, एकनाथ पाटील, अविनाश पाटील, महादेव कोथळकर, रघुनाथ जाधव , वसंतराव पाटील, सुनील कारंडे, शिवाजीराव पाटील, शंकर
दादू पाटील, डी. पी. कांबळे,
बाबूराव हजारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भोगावती कारखाना पाण्याअभावी बंदभोगावती : भोगावती साखर कारखाना पाण्याअभावी शुक्रवारी दुपारपासून बंद ठेवण्यात आला आहे. भोगावती नदीला सध्या पाटबंधारे खात्याकडून काही कालावधीसाठी पाणीपुरवठा कमी केला आहे. त्याचा परिणाम कारखान्यावर होऊन कारखाना पाण्याअभावी आता बंद आहे.