कोंडकेंवरील अविश्वास ठरावाला स्थगिती
By Admin | Updated: August 15, 2014 00:52 IST2014-08-15T00:47:20+5:302014-08-15T00:52:14+5:30
न्यायालयाचा निर्णय : पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला

कोंडकेंवरील अविश्वास ठरावाला स्थगिती
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला आज, गुरुवारी सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर चव्हाण यांनी स्थगिती दिली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ६ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे.
महामंडळाचा फेरलेखापरीक्षणाचा अहवाल देण्यावरून चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री छाया सांगावकरने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यासोबत अर्जुन नलवडे आणि सुरेंद्र पन्हाळकर होते. या प्रकरणावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ४ आॅगस्ट रोजी खासबाग येथील कार्यालयात चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी कार्यकारिणी सदस्यांनी महामंडळाची आणि उपाध्यक्षांची बदनामी केल्याबद्दल या तिघांचेही सभासदत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याला अध्यक्ष विजय कोंडके यांनी विरोध केला होता. या तिघांनाही अध्यक्षांचीच फूस असल्याचा आरोप करत कार्यकारिणीने या बैठकीत त्यांच्याविरोधात ९ विरुद्ध २ असा अविश्वास ठराव करून त्यांना तातडीने पदमुक्त केले होते. येत्या १५ तारखेला नूतन अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती.
मात्र, दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे या अविश्वास ठरावाला विजय कोंडके यांनी सहदिवाणी न्यायालयात आव्हान दिले. यावर आज पहिली सुनावणी झाली. यात अॅड. पी. आर. पाटील यांनी कोंडके यांची बाजू मांडली.
बैठकीच्या दिवशी फक्त विनयभंग प्रकरणाच्या चौकशीचा विषय अजेंड्यावर होता. त्याव्यतिरिक्त अन्य विषयांवर
चर्चा केली जाणार नाही, हे नमूद होते. अविश्वास ठरावासाठी १५ दिवस आधी नोटीस देणे गरजेचे असते, असे मुद्दे मांडून हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीश चव्हाण यांनी अध्यक्षांच्या कामात अडथळा निर्माण करू नये, अशी टिप्पणी करीत त्यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. तसेच नूतन अध्यक्ष निवड केली जाऊ नये, असे सांगितले असल्याची माहिती अॅड. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)