'स्पॉट बिलिंग'ला अखेर स्थगिती

By Admin | Updated: June 4, 2016 00:32 IST2016-06-03T23:58:23+5:302016-06-04T00:32:16+5:30

स्थायी समितीचा निर्णय : त्रुटी दूर होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच पाणी बिले

Suspension for 'Spot Billing' | 'स्पॉट बिलिंग'ला अखेर स्थगिती

'स्पॉट बिलिंग'ला अखेर स्थगिती

कोल्हापूर : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या स्पॉट बिलिंग पद्धतीमध्ये अनेक त्रुटी असून, त्या दुरुस्त होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच पाण्याची बिले देण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. स्पॉट बिलिंगमधील गोंधळाचा पर्दाफाश करणारी खास वृत्तमालिका ‘लोकमत’ मध्ये २४ ते २७ मेच्या दरम्यान प्रसिद्ध झाली होती. त्याचा आधार घेऊन स्थायी समितीच्या सभेत रिना कांबळे यांनी स्पॉट बिलिंगचा मुद्दा मांडला. त्यांनी सभागृहात काही बिले आणली होती. स्पॉट बिलिंगमुळे पाण्याची बिले तीन ते चार महिन्यांनी मिळत आहेत. त्यामुळे रक्कम वाढून येत आहे. मीटर रीडरने दिलेल्या बिलांवरील शाई काही काळाने पुसली जाते. त्यामुळे ही बिले हाताळणे, जपून ठेवणे अशक्य होत आहे. त्यामुळे या त्रुटी आधी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अजित ठाणेकर यांनीही हाच मुद्दा आग्रहाने मांडला. लक्ष्मीपुरीतील शेलाजी वन्नाजी शाळेची जुनी इमारत पाडून शाळेची इमारत तसेच सांस्कृतिक सभागृह नव्याने बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी खासदार फंडातून ३५ लाखांचा निधी मिळविला आहे. शाळा पाडून केवळ सांस्कृतिक हॉल बांधला जाणार आहे, असा समज झाल्यामुळे सभेत वाद झाला. ठाणेकर यांनी शाळेचे अस्तित्व ठेवूनच हॉलचे बांधकाम करावे, असा आग्रह धरला. सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे शासकीय कंपन्यांकडूनच औषध खरेदी करावी, अशी सूचना रूपाराणी निकम यांनी केली. नवीन टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींची माहिती नगरसेवकांनाही द्यावी, अशी मागणी सुनील पाटील, दीपा मगदूम यांनी केली. झाडांच्या धोकादायक, वाळलेल्या, विद्युत तारांना टेकणाऱ्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडाव्यात, अशी सूचना ठाणेकर यांनी केली. रुईकर कॉलनीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढावी, असे उमा इंगळे यांनी सांगितले. उचगाव येथे नदीपात्रातील बांधकामाची पाहणी करून माहिती देण्याची सूचना रूपाराणी निकम यांनी केली.
लोकमत इफेक्ट
पाणीपुरवठ्याची स्पॉट बिलिंग ही योजना चांगली असून, त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढेल; परंतु त्याचा नागरिकांना, कर्मचाऱ्यांना त्रास होणार असेल तर त्यातील त्रुटी दूर कराव्यात, अशी सूचना सभापती मुरलीधर जाधव यांनी केली. त्यामुळे प्रशासनाने जुन्या पद्धतीनेच बिले देण्याचे मान्य केले.

Web Title: Suspension for 'Spot Billing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.