नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती
By Admin | Updated: June 3, 2015 01:02 IST2015-06-03T00:43:16+5:302015-06-03T01:02:00+5:30
जगदाळे यांची माहिती : ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश

नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील दुकानगाळ्याप्रश्नी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्तांनी नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्त करण्याच्या आदेशाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे.
नृसिंहवाडी येथील दुकानगाळेप्रश्नी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आंदोलन अंकुशच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त पुणे यांनी १३ एप्रिल रोजी नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात सरपंच राजश्री कांबळे यांच्यासह आठ सदस्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे अपील केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत बरखास्त स्थगितीचे आदेश कार्यासन अधिकारी चंद्रकांत वळाप यांनी दिले. तसे पत्र विभागीय आयुक्त पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापूर व गटविकास अधिकारी शिरोळ यांच्यासह ग्रामपंचायातीस प्राप्त झाल्याची माहिती उपसरपंच अभिजित जगदाळे व ग्रा.पं. सदस्य अनंत धनवडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरपंच सौ. राजश्री कांबळे उपस्थित होत्या.
उपसरपंच अभिजित जगदाळे म्हणाले, चुकीच्या ध्येयधोरणावर काम करत गावाला नाहक वेठीस धरणाऱ्या आंदोलन अंकुश च्या या लढ्यात आम्हाला यश मिळाले. ज्या दुकानगाळ्याप्रश्नी ग्रामपंचायत बरखास्त झाली, त्या गाळेधारकांना ग्रामपंचायतीचे नुकसान न करता तीस टक्के भाडेवाढ करून बेरोजगार दुकानदारांचे हित जपले. हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे सांगून या लढ्यात आम्हाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुरेश हाळवणकर, योगेश ठिळेकर, अमल महाडिक यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद करून गावाच्या विकासकामात खोड घालणाऱ्या आंदोलन अंकुशने गावची बदनामी करणे थांबवावे, असे आवाहन केले.
ग्रा. पं. सदस्य अनंत धनवडे, महाआघाडीचे अध्यक्ष विकास पुजारी म्हणाले, ग्रामपंचायतीने गेल्या साडेचार वर्षांत चांगला कारभार केला आहे. ग्रामपंचायतीवर बदनामीचे आरोप आंदोलन अंकुशने करू नयेत.
यावेळी वकील प्रकाश भेंडवडे यांचा सत्कार केला. ग्रा. पं. सदस्य परशुराम गवंडी, अशोक पुजारी, सौ. अरुंधती पुजारी, सौ. कांचन कंदले यांच्यासह सोमनाथ पुजारी, तानाजी कदम, बाळासाहेब आलासकर, बाळकृष्ण कंदले, कृष्णा गवंडी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)