डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By Admin | Updated: December 19, 2014 23:50 IST2014-12-19T23:44:44+5:302014-12-19T23:50:52+5:30

खंडेराजुरीत प्रसुतीकडे दुर्लक्ष : डॉक्टरांचा घरभाडेभत्ता कपात करणार

Suspension notice to employees including doctors | डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी आणि पाच आरोग्य सेविका व सेवकांवर कारवाईचा प्रस्ताव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली आहे. मुख्यालयात राहात नसल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.
गुरुवारी खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिलेची प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा आरोप मिरज पंचायत समिती सदस्यांनी केला होता. याप्रकरणी ताालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधू पाटील यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. याचा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे, आरोग्यसेविका सौ. एस. बी. तांबे, ई. एस. मुल्ला, एम. एस. पाटील, आरोग्यसेवक एम. एस. गोपाल यांच्यावर दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून कारवाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. तुमच्यावर निलंबनाची कारवाई का करू नये, असे त्यात म्हटले आहे. मुख्यालयात राहात नसल्याबद्दलचा खुलासाही त्यांच्याकडून मागविला आहे. या अहवालानंतर दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)


निलंबनाची कारवाई करणार
खंडेराजुरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी आहेत. मुख्यालयातही ते राहात नाहीत. याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा घरभाडेभत्ता कपात करून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Suspension notice to employees including doctors