कारखान्यांना बजावलेल्या आयकर नोटिसांना स्थगिती
By Admin | Updated: May 7, 2015 00:19 IST2015-05-06T23:14:02+5:302015-05-07T00:19:46+5:30
अरुण जेटलींचे आदेश : राजू शेट्टींची माहिती

कारखान्यांना बजावलेल्या आयकर नोटिसांना स्थगिती
जयसिंगपूर : साखर कारखान्यांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटिसींना तत्काळ स्थगिती देण्याचा आदेश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी अर्थमंत्रालयात दिला. उचित आणि लाभकारी मूल्यापेक्षा (एफआरपी) जास्त उसाचा दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाने आयकराबाबत नोटिसा पाठविलेल्या होत्या. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेत भेट घेऊन विनंती केली होती, त्यावेळी हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती खा. राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकार उसाला उचित आणि लाभकारी मूल्य (एमआरपी) संपूर्ण देशाला जाहीर करीत असते; परंतु राज्यनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. साखर नियंत्रणमुक्त करणाऱ्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार प्रत्येक राज्याने एफआरपीपेक्षा जादा भाव किती निघतो, हे पाहण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे सुचविले होते. शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांना विनंती केली की, केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सुचविलेल्या दराएवढी उसाची किंमत देणाऱ्या साखर कारखान्यांना देण्याचे आदेश काढले. येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबण्यास सांगितले. कारण जुलै महिन्यात पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यासंबंधी सभागृहात मांडून निर्णय घेण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिसा हा चिंतेचा विषय झालेला होता. यामुळे हा विषय निकाली निघण्याचे मार्ग खुले झाले आहेत. या शिष्टमंडळात साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खा. संजय पाटील, खा. राजू शेट्टी व खा. सुप्रिया सुळे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
कारखान्यांच्या चिंतेचा विषय मार्गी
एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना नोटिसा हा चिंतेचा विषय होता. यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली होती.
त्यामुळे हा विषय निकाली निघण्याचे मार्ग खुले झाले आहेत.