‘भोगावती’च्या नोकर भरतीस स्थगिती
By Admin | Updated: July 1, 2016 00:17 IST2016-07-01T00:13:45+5:302016-07-01T00:17:17+5:30
तातडीने अहवाल द्या : साखर सहसंचालकांचा प्रशासकीय मंडळास आदेश

‘भोगावती’च्या नोकर भरतीस स्थगिती
राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्यात झालेल्या नोकर भरतीस स्थगिती देऊन या भरतीबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी ‘भोगावती’च्या प्रशासक मंडळाला दिले आहेत. विशेष लेखापरीक्षक अजय ससाणे यांच्या अहवालाची दखल घेत हा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश गुरुवारी दुपारी प्रशासक मंडळाला मिळाल्याचे समजताच सोशल मीडियावरून तो तत्काळ ‘भोगावती’च्या कार्यक्षेत्रात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
‘भोगावती’च्या नोकर भरतीबाबत सहकारमंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांच्याकडे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले व सुभाष जाधव यांनी तक्रार देऊन नियमबाह्य नोकर भरती झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक अजय ससाणे यांची नियुक्ती केली होती. ससाणे यांनी अहवालात ५८० जणांची नोकर भरती करताना शासन परवानगी, साखर आयुक्त, सहआयुक्तांची परवानगी न घेता बेकायदेशीर नोकर भरती केली असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी या नोकर भरतीस स्थगिती देऊन केलेल्या कारवाईचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश ‘भोगावती’च्या प्रशासकीय मंडळाला दिले आहेत. १४ जूनला पत्राद्वारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा नवीन आदेश काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अनेकांचे धाबे दणाणले
‘भोगावती’त नोकर भरतीवरून मोठा गदारोळ झाला होता. मोठ्या आर्थिक उलाढाली होऊन ही नोकर भरती झाली होती.
नोकर भरतीचा आकृतिबंध पाळला नसल्याने ही नोकर भरती वादग्रस्त बनली होती.
अशातच साखर सहसंचालकांनी या भरतीस स्थगिती देऊन अहवाल पाठविण्याचे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.