जाळपोळीनंतर ‘एव्हीएच’ला स्थगिती
By Admin | Updated: March 8, 2015 00:47 IST2015-03-08T00:47:08+5:302015-03-08T00:47:51+5:30
अधिकाऱ्यांना कोंडले : वाहनांची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

जाळपोळीनंतर ‘एव्हीएच’ला स्थगिती
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त ‘एव्हीएच’ केमिकल्स प्रकल्प शनिवारी संतप्त जमावाने पेटवून दिला. प्रकल्प पेटल्याने आकाशात धुराचे लोट जाताना दिसत होते. एव्हीएच प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांची गाडी पाटणे फाटा येथे पेटवली.
त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके व उपविभागीय अधिकारी मनीष होळकर यांना सुमारे सहा तास कोंडून घातले. या अधिकाऱ्यांच्या दोन आलिशान गाड्या जाळल्या, तर प्रांताधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा व पोलिसांच्या अन्य गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. या गाड्याही संतप्त नागरिकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जनतेच्या उद्रेकाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रकल्पाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.
प्रदूषणकारी एव्हीएच केमिकल प्रकल्प चंदगड तालुक्यातून हद्दपार करावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न चालवले होते. प्रकल्पाला २८ जानेवारी २०१५ रोजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी एव्हीएचला उत्पादन घेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर गेले महिनाभर त्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भात आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची एकत्र बैठक घेऊन प्रकल्पाच्या दुष्परिणामांची माहिती देऊन प्रकल्पाला स्थगितीची मागणीही केली होती. त्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ११ फेब्रुवारी रोजी प्रकल्पाला स्थगितीचे आदेश देण्याबाबत त्यांच्या प्रधान सचिवांना आदेश बजावले; परंतु सचिवांनी ते आदेश एव्हीएच कंपनीला लागू केले नसल्याने लोकांमध्ये संतप्त भावना होती.