कनिष्ठ लिपिक पदोन्नतीबाबतचे ठराव निलंबित
By Admin | Updated: May 11, 2016 01:06 IST2016-05-11T01:05:43+5:302016-05-11T01:06:18+5:30
‘नगरविकास’चा दणका : खात्यांतर्गत परीक्षेची अट कायम राहणार

कनिष्ठ लिपिक पदोन्नतीबाबतचे ठराव निलंबित
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लिपिक वर्ग - ३’च्या संवर्गातील पदोन्नतीबाबत मंजूर केलेला ठराव क्रमांक २४० व त्याची उपसूचना (क्रमांक ४२) पूर्णत: निलंबित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश उपसचिव अ. र. परशुरामे यांनी काढला आहे.
या आदेशात म्हटले आहे, ‘महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे ठराव क्रमांक २४० (दि. २० मे २०१५) मधील उपसूचना आणि ठराव क्रमांक ४२ (दि. २७ आॅगस्ट २०१५) ही विविध संवर्गातील पदोन्नतीसाठी विहीत केलेल्या विभागीय परीक्षेची तरतूद रद्द करावयाची असून, मुंबई प्रांतिक कायदा १९४९ च्या कलम ४६५(१) अंतर्गत विनियमित केलेल्या तरतुदींशी विसंगत असल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ मधील कलम ४५१ (१)नुसार ठराव क्रमांक २४० मधील उपसूचना व ठराव क्रमांक ४२ पूर्णत: निलंबित करण्यात येत आहे. महापालिका कायदा कलम ४५१(२) नुसार आदेशाच्या दिनांकापासून महिन्याच्या आत संबंधितांना अभिवेदन करण्यास संधी देण्यात येत आहे. ती न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लिपिक वर्ग-३’ संवर्गातील पदोन्नतीसाठी नियमातील तरतुदीनुसार कार्यपद्धती अवलंबण्यास मान्यता व्हावी म्हणून आॅफिस प्रस्ताव आला होता. त्यामध्ये खात्यांतर्गत परीक्षा प्रस्तावित करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांची सलग सेवा ५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना परीक्षेची अट शिथिल करण्यात यावी. शिपाई व पवडी कामगारांसाठी पूर्वी २० टक्के जागेचे धोरण मंजूर होते. त्याऐवजी शिपाई व पवडी कामगारांसाठी ३५ टक्के जागेचे धोरण मंजूर करून सफाई व झाडू कामगारांसाठी असलेले २५ टक्के जागेच्या धोरणाऐवजी ३५ टक्के जागा मंजूर करण्याबाबत उपसूचना दिली होती. (प्रतिनिधी)