आमदार महाडिक काँग्रेसमधून निलंबित
By Admin | Updated: December 19, 2015 01:13 IST2015-12-19T01:13:15+5:302015-12-19T01:13:52+5:30
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा आदेश : विधान परिषदेची बंडखोरी भोवली

आमदार महाडिक काँग्रेसमधून निलंबित
कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषद मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार व आता भाजपच्या पाठिंब्यावर हीच निवडणूक लढवीत असलेले महादेवराव महाडिक यांना काँग्रेसने शुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार महाडिक यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. ही उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे व आपण यांपैकी कुणालाही उमेदवारी द्या, त्यांना मी निवडून आणतो, अशी भूमिका घेतली; परंतु तरीही पक्षाने सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात असले तरी त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे; म्हणून त्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे या आदेशात म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस गणेश पाटील यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आला आहे. तो महाडिक यांच्या सुस्वम, घर नं ७/१, शिरोली (पुलाची), ता. हातकणंगले या पत्त्यावर त्यांना पाठविण्यात आला आहे.
पक्षाने त्यांना निलंबित केले असले तरी तसे आताही महाडिक तांत्रिकदृष्ट्याच पक्षात होते. त्यांचा मुलगा अमल हा भाजपचा आमदार, तर सून भाजपच्याच चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. पुतण्या धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसविरोधात ताराराणी आघाडी रिंगणात उतरविली होती. खरे तर त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई अपेक्षित होती; परंतु जिल्हा काँग्रेसकडून अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात ही कारवाई आता त्यांनी बंडखोरी करून पक्षालाच आव्हान दिल्यानंतर झाली आहे.
महाडिक हे स्वत:च मी सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे सांगतात. पक्ष संघटनेशीही तसा त्यांचा अर्थाअर्थी फारसा काही संबंध कधीच नसतो. काँग्रेस कमिटीची पायरीही ते फारच कधीतरी चढतात. आपण स्वत:च एक पक्ष असल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यावर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करण्याची घोषणा केली होती; परंतु पुढे तेच महाडिक काँग्रेसच्याच चिन्हावर विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले.
शहाजीतात्यांना कारणे दाखवा...
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे पक्षप्रतोद असलेल्या शहाजीतात्या पाटील यांनाही पक्षाने ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली आहे. पाटील हे महाडिक यांचे कट्टर समर्थक आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक यांच्या उमेदवारीस ते सूचक आहेत. तशी तक्रार पक्षाकडे करण्यात आली आहे. महाडिक हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवीत असल्याने त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही करणे ही बाब सकृतदर्शनी पक्षशिस्तीचा भंग करणारी ठरते. तरी त्याबद्दल तीन दिवसांत म्हणणे मांडावे अन्यथा आपल्याला या संदर्भात काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांना दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे.
पक्षाकडून मला निलंबनाचा तसा कोणताही आदेश अद्याप मिळाला नसल्याने मला या कारवाईसंबंधी काही बोलायचे नाही.
- आमदार महादेवराव महाडिक