आज-याचे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:43+5:302021-07-07T04:31:43+5:30
आजरा : लाच घेणारे आज-याचे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करावे, त्यांना सरकारी सेवेत पुन्हा घेवू नये. ...

आज-याचे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करा
आजरा : लाच घेणारे आज-याचे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करावे, त्यांना सरकारी सेवेत पुन्हा घेवू नये. आजरा तहसील कार्यालयातील प्रलंबित कामे त्रयस्थ प्रांताधिकारी यांचेमार्फत १५ दिवसांत पूर्ण करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना आज दिले.
आज-याचे महसूल नायब तहसीलदार तथा उपलेखापाल वर्ग-३ चे संजय इळके व तलाठी राहुल बंडगर या दोघांना ७५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
देऊळवाडी (ता. आजरा) येथील गट नंबर २० मधील ३ एकर जमिनीपैकी २ एकर जमीन मूळ मालकाकडून तक्रारदार यांनी नोटरी करून घेतली आहे. ही जमीन वर्ग-१ करण्याकरिता १ लाख ५० हजारांची लाच मागितली होती. ती संगनमताने ७५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले. अधिका-यांनी ठरल्याप्रमाणे लाच घेतली. त्यांच्यावर कारवाईदेखील झाली.
आजरा तहसील कार्यालयात जमीन व इतर महसूल कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व एजंट यांची साखळी आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. लाच न देणा-या नागरिकांचे काम वर्षानुवर्षे होत नाही. म्हणून शिवसेनेतर्फे आजरा तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याशिवाय प्रांताधिकारी यांनी सर्व दप्तरांची सरकारी तपासणी करावी व त्यांनी सरकारी लेखा परीक्षणाच्यावतीने सरकारी आॅडिट करावे.
आजरा तहसील कार्यालयातील प्रलंबित असणारी शेतकरी व नागरिकांची सर्व कामे त्रयस्थ प्रांताधिकारी यांच्यामार्फत १५ दिवसांत पूर्ण करावीत. लाच घेणारे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करावे व सरकारी सेवेत पुन्हा घेवू नये, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची सही आहे.
फोटो ओळी : आज-याचे नायब तहसीलदार व तलाठी यांना निलंबित करा या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे.
क्रमांक : ०६०७२०२१-गड-०७