संशयित स्प्लेंडर कळंब्यातील
By Admin | Updated: February 25, 2015 00:50 IST2015-02-25T00:47:46+5:302015-02-25T00:50:33+5:30
महिन्यापूर्वी चोरी : गाडी एस.टी.च्या वाहकाची; पानसरे हत्या प्रकरणाशी धागेदोरे मिळण्याची शक्यता

संशयित स्प्लेंडर कळंब्यातील
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सुरू असताना कागल येथे दूधगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील पात्रामध्ये कागल पोलिसांना संशयितरीत्या सापडलेली हीरो होंडा स्प्लेंडर ही कळंबा (ता. करवीर) येथील एका एस. टी. वाहकाची असल्याचे मंगळवारी तपासात स्पष्ट झाले. दुचाकीच्या चेसनंबरवरून मालकाचा शोध लागला. त्यांनी एक महिन्यापूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाडी चोरीस गेल्याचे सांगितले.
दरम्यान, पानसरे यांच्या मारेकऱ्यांनीही स्प्लेंडर मोटारसायकल वापरल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याने ‘त्या’ दुचाकीचे या घटनेशी साम्य मिळते-जुळते आहे का, याचा पोलीस शोध कसून शोध घेत आहेत. मोटारसायकल चोरीच्या संशयावरून राजारामपुरी पोलिसांनी आरसी गँगच्या १५ सदस्यांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेतून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येचा तपास सुरू असताना पोलिसांना कागल येथे दूधगंगा नदीमध्ये संशयास्पद
स्प्लेंडर मोटारसायकल मिळाल्याने पोलिसांची तपासाची चक्रे गतीमान झाली. दुचाकी चोरीची आहे की कोणत्या गुन्ह्णातील आहे याचा शोध घेण्यासाठी चेस क्रमांकाच्या आधारे मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तो कळंब्यातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. ते संभाजीनगर येथील एस. टी. डेपोमध्ये वाहक पदावर कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी कागल पोलीस ठाण्यात येऊन मोटारसायकल
पाहिली असता ती आपलीच असून एक महिन्यांपूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे सांगितले.
चोरट्याने गाडीचे पाठीमागील चाक व पुढचे फुटलेले टवळे नवीन घातल्याचे दिसते, तसा जबाबही त्यांचा घेण्यात आला.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल व करवीचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन नदीपात्रामध्ये आणखी कोणती वस्तू मिळते का याचा पानबुड्यांच्या साहाय्याने शोध घेतला परंतु मोटारसायकलचे सुटे पार्ट सोडून काहीही हाती लागले नाही.(प्रतिनिधी)
आयजींनी घेतली बैठक
पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार शर्मा यांनी मंगळवारी रात्री सर्व तपास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संशयास्पद आढळलेल्या दुचाकीवरून आरोपींचा माग काढण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.