इचलकरंजीतील खंडणी प्रकरणातील संशयितास अटक
By Admin | Updated: July 3, 2016 00:41 IST2016-07-03T00:41:05+5:302016-07-03T00:41:05+5:30
गट्टाणी खून प्रकरणातील साक्षीदारांकडून मागितली खंडणी

इचलकरंजीतील खंडणी प्रकरणातील संशयितास अटक
इचलकरंजी : येथील कापड व्यापारी मनोज गट्टाणी खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या लाला मलिक याच्या मित्रानेच त्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या दोघांना बोगस नंबरवरून संदेश पाठवून खंडणी मागितल्याचे शनिवारी उघडकीस आले. अर्जुन धोंडिराम शेळके (वय २७, रा. श्रद्धा कॉलनी, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कॉल डिटेल्स् व लोकेशनवरून अर्जुन यास अटक केली आणि शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केले.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील जुन्या चंदूर रोड परिसरात कापड व्यापारी मनोज गट्टाणी यांचा खंडणी दिली नसल्याच्या कारणावरून खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी लाला मलिक याच्यासह सहाजणांना त्यावेळी अटक केली आहे. तर या प्रकरणात अनिल चंदनमल मंत्री व श्रीवल्लभ रामस्वरूप बांगड हे दोघे साक्षीदार आहेत. लालाचा मित्र अर्जुन हा लाला याला दोनवेळा कोर्टात व दोनवेळा जेलमध्ये जाऊन भेटला होता. त्यावेळी या प्रकरणाच्या चार्जशीट झेरॉक्सवरून ही माहिती अर्जुनला समजली. या खून प्रकाराने मंत्री व बांगड हे दोघे मानसिक तणावाखाली असतील, याचा फायदा आपण घ्यावा, या हेतूने अर्जुनने बोगस सीमकार्ड खरेदी करून त्यावरून दोघांना धमकीचे संदेश पाठविले. त्यामध्ये मुलास ठार मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
याबाबत मंत्री यांनी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर बांगड यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी अर्ज दिला आहे. त्यानुसार तपास करीत पोलिसांनी सायबर क्राईम विभागाच्या मदतीने संबंधित संदेश आलेल्या नंबरचे कॉल डिटेल्स् व लोकेशन (ठिकाण) शोधून काढले आणि अर्जुन याला त्याच्या घरासमोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल, सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)