सूर्यकिरणांनी केला अंधुकसा चरणस्पर्श
By Admin | Updated: November 11, 2014 00:18 IST2014-11-11T00:16:14+5:302014-11-11T00:18:22+5:30
अंबाबाईचा किरणोत्सव : ढगाळ वातावरण, प्रदूषण

सूर्यकिरणांनी केला अंधुकसा चरणस्पर्श
कोल्हापूर : दुपारपासून झालेले ढगाळ वातावरण आणि प्रदूषणामुळे किरणांची तीव्रता कमी झाल्याने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंधुकसा चरणस्पर्श केला.
मंदिरशैली आणि वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात कालपासून किरणोत्सवाला प्रारंभ झाला. काल, ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नव्हता. आजही दुपारी तीन वाजल्यानंतर वातावरण ढगाळ झाल्याने सूर्यकिरणेच दिसेनाशी झाली होती. त्यामुळे आजही भाविकांना आजही किरणोत्सव होणार नाही, अशी शंका होती. मात्र, संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी पितळी उंबऱ्यात आलेल्या सूर्यकिरणांनी ५ वाजून ४६ मिनिटाला अंबाबाईच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. त्यानंतर किरणे ढगाआड गेली.
किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊन ती मूर्तीच्या मुखावर पडण्यासाठी सूर्यकिरणांची अधिकाधिक तीव्रता १० लक्स मीटर तर कमीत कमी तीव्रता ३ लक्स मीटर असावी लागते. आज ०.५ इतकी कमी तीव्रता असल्याने अपेक्षेप्रमाणे किरणोत्सव होऊ शकला नाही. ‘केआयटी’चे प्राध्यापक किशोर हिरासकर व खगोल अभ्यासक मिलिंद कारंजकर यांनी किरणोत्सवाचे निरीक्षण केले.
किरणोत्सवादरम्यान मंदिरातील सर्व लाईट बंद केलेले असतात. मात्र, गाभाऱ्यातील काही छायाचित्रकार आणि भाविक मोबाईलद्वारे छायाचित्र घेताना कॅमेरातून पडणाऱ्या फ्लॅशमुळे किरणोत्सवात प्रचंड अडथळा येतो. यावर एका भाविकाने संतप्त प्रतिक्रिया दिली नंतर त्यांनी देवस्थान समितीच्या कार्यालयात आपली तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)