सूर्यकिरणांनी केले अंबाबाईचे चरणस्पर्श
By Admin | Updated: November 10, 2016 00:25 IST2016-11-10T00:27:39+5:302016-11-10T00:25:50+5:30
पहिला दिवस : दव, धुलीकणांबरोबरच किरणांना इमारतींचा अडथळा

सूर्यकिरणांनी केले अंबाबाईचे चरणस्पर्श
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी किरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला. त्यामुळे आज, गुरुवारी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी किरणे कंबरेच्या वरपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
भारतीय प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाई देवीच्या मंदिराकडे पाहिले जाते. याशिवाय साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हेमाडपंथी बांधकामाचा नमुना असलेल्या या मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव सोहळा होतो. यामध्ये दक्षिणायन व उत्तरायण असे दोन किरणोत्सव होतात. त्यापैकी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला.
पहिल्या दिवशी बुधवारी किरणांची तीव्रता चांगली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी अंबाबाई देवीच्या गुडघ्यांपर्यंत स्पर्श केला. या किरणोत्सवात डाव्या बाजूच्या दोन इमारतींवरील जिन्याच्या टोप्या या किरणांमध्ये अडथळा ठरल्या. त्यामुळे बुधवारी पहिल्याच दिवशी किरणांना देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्यात अडथळा आला. याशिवाय हिवाळ्यातील दव, धुलीकणांचाही यात अडथळा ठरला. हा सोहळा तसा ४९ मिनिटांचा ठरला.
आज, गुरुवार किरणोत्सवाचा दुसरा दिवस असून, यामध्ये किरणांची तीव्रता लक्षात घेता ती देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
किरणांची तीव्रता चांगली असूनही ती टिकली नाहीत. कारण यामध्ये महाद्वार दरवाजाकडील डाव्या बाजूच्या मिणचेकर, आगळगावकर यांच्या इमारतींवरील जिने, टेरेसवरील टोपी यांचा अडथळा आला. हे अडथळे महापालिकेकडून दूर झाले, तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल.
- उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ.
किरणांची तीव्रता चांगली होती; परंतु दव, धुलीकणांमुळे ती कमी झाली. इमारतींचे अडथळे दूर झाले तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल. अडथळा नसता तर पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचली असती.
-प्रा. किशोर हिरासकर,
किरणोत्सव अभ्यासक
किरणांची तीव्रता प्रथम चांगली होती; पण काही वेळानंतर वक्रीकरण किरणे होत गेल्याने तीव्रता कमी झाली. आज, गुरुवारी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यात किरण कंबरेपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे.
- प्रा. मिलिंद कारंजकर,
किरणोत्सव अभ्यासक
दक्षिणायन : अशी पोहोचली किरणे
ठिकाण वेळ लक्स
महाद्वार दरवाजा सायं. ४ : ५६ मिनिटे २०,६०० लक्स
गरुड मंडप सायं. ५ :०२ मिनिटे १२,८०० लक्स
पितळी उंबरठासायं. ५:३० ते ५:३६ मिनिटे १७५ लक्स
दुसरी पायरी सायं. ५:४० मिनिटे १०६ लक्स
तिसरी पायरीसायं. ५:४२ मिनिटे ३१ लक्स
गर्भकुटी सायं. ५:४५ मिनिटे ७ लक्स
चरणस्पर्श सायं. ५:४६ मिनिटे ६ लक्स
गुडघ्याच्या खालपर्यंत सायं. ५:४७ मिनिटे ३ ते ६ लक्स