मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण
By Admin | Updated: June 1, 2015 00:12 IST2015-05-31T22:52:33+5:302015-06-01T00:12:28+5:30
चाचपणी : तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत

मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण
मिरज : मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक सुनील वर्मा, उपव्यवस्थापक एस. के. तिवारी यांच्यासह तांत्रिक अधिकाऱ्यांनी रेल्वेमार्गाची पाहणी केली. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या दुहेरीकरण, विद्युतीकरणाची रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. यासाठी तीन हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून, मिरज-पुणे मार्गासाठी यावर्षी ३९९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या बांधकाम, लोहमार्ग, जोडणी, विद्युत विभागासह विविध तांत्रिक विभागांकडून सर्वेक्षण होणार असून, यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.
मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची व विद्युतीकरणाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे मिरज-पुणे मार्गावरील प्रवास जलद होणार आहे. रेल्वेगाड्यांचा वेग व रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाने २८० किलोमीटर रेल्वेमार्गासह साताऱ्याजवळ सालपा ते आदर्कीदरम्यान डोंगरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाची पाहणी केली. सालपा ते आदर्कीदरम्यान डोंगरात बोगदा काढून पर्यायी रेल्वेमार्गाची चाचणी करण्यात येत आहे. या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या व वाहतूक कमी असल्याने, दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचा पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र आता रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा व निधीची तरतूद झाल्याने मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. (वार्ताहर)