‘गोकुळ’च्या निवडणुकीचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST2021-04-26T04:21:26+5:302021-04-26T04:21:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचा आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. सत्तारूढ गटाच्या याचिकेवर ...

‘गोकुळ’च्या निवडणुकीचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचा आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. सत्तारूढ गटाच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात न्यायालयाने निवडणुकीबाबत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील कोराेनाचा वाढता संसर्ग, त्यात दोन ठरावधारकांचा काेरोना संसर्गाने झालेला मृत्यू, या सर्व घडामोडींवर न्यायालय काय आदेश देते, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. सत्तारूढ गटाने दोन वेळा निवडणूक स्थगितीची याचिका न्यायालयात सादर केली होती. मात्र, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिला होता, त्यानुसार मागील महिनाभर ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सत्तारूढ गटाच्या वतीने दाेन संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुकीला आव्हान दिले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे, ठरावधारकांनाही संसर्ग झाला असून, त्यातून दोघांचा मृत्यू झाल्याचे न्यायालयात मांडले. न्यायालयाने यावर राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मागील आठ दिवस सरकारच्या पातळीवर तयारी सुरू होती.
आज, सरकारच्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यावर सुनावणी होऊन निवडणुकीबाबत न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे.
मतदानासाठी पाच दिवस राहिल्याने उत्सुकता
‘गोकुळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे, मतदानासाठी अवघे पाच तर प्रचारासाठी चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत न्यायालय काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
निकालानंतर हालचाली गतिमान होणार
कोरोनाचा वाढता संसर्ग, दोन ठरावधारकांचा मृत्यू यामुळे निवडणुकीला स्थगिती मिळणार, असे सत्तारूढ गटाला वाटते. त्यामुळे त्यांनी सावध हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरच व्यूहरचना वेग घेणार हे निश्चित आहे.
मतदान केंद्रांची नावे आज निश्चित
‘गोकुळ’चे ३,६५० ठरावधारक मतदार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील मोठ्या शाळा, महाविद्यालयात केंद्रे राहणार आहेत. त्यानुसार आज, सोमवारी केंद्रांची नावे निश्चित होणार आहेत.